कल्याण – कल्याण आणि भिवंडीत प्रतिबंधित गांजा आणि गुटख्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस आणि भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. दोन वेगळ्या या घटनांच्या माध्यमातून पोलिसांनी तस्करी करण्यात येत असलेला सुमारे १४ लाखाचा गांजा आणि गुटखा जप्त केला आहे. तस्करी करणारे बेरोजगार तरूण आहेत.
याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस आणि भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवरून पोलिसांनी मोहम्मद बेलाल शकील अहमद कुरेशी (३०) याला अटक केली आहे. भिवंडीतील दांडेकर वाडीतील गैबी पीर दर्गा भागातील वफा गृहसंकुलात तो राहतो. याप्रकरणातील दुसरा आरोपी पंकज रामअवतार पंडित (१९) हा भिवंडीतील शिवाजी चौक खारीपार भागातील गणेश शेठ चाळीत राहतो. या दोघांकडून लोहमार्ग पोलिसांनी सुमारे एक लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
भिवंडीतील नारपोली पोलिसांनी भिवंडी भागात गांजाची तस्करी करणाऱ्या गणेश अर्जुन पावरा (२९) याला अटक केली आहे. तो धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोळीद गावचा रहिवासी आहे. राकेश छत्तरसिंग पावरा (२५) हा शिरपूर तालुक्यातील बोरमळी गावचा रहिवासी आहे. याप्रकरणातील तिसरा इसम रवींद्र गनेदास बोरला (२५) हा मध्यप्रदेशातील वाढवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील धामण्या गावचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १३ लाख ५० हजार रूपयांचा गांजा जप्त केला आहे.
भिवंडीतील नारपोलिसांचे पथक गेल्या गुरूवारी रात्रीच्या वेळेत कामतनगर, ब्रह्मानंदनगर, गणेश मंदिर भागात गस्त घालत होते. गस्ती पथकाला कामतघर भागात एक मोटार उभी असल्याचे आणि त्यामधील तीन जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी मोटारीची तपासणी केली. मोटारीत २१ किलो वजनाचा मानवी शरीरावर घातक परिणाम करणारा गांजा आढळून आला. १० गठ्ठ्यांमध्ये प्लास्टिक पिशवीत गांजा बंदिस्त करून आणण्यात आला होता.
बाजारातील या गांजाची किंमत १३ लाख ५० हजार असल्याचे आढळले. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार अजित गुंजाळ यांच्या तक्रारीवरून या तिघा तस्करांविरुध्द अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आकाश पवार याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मागील गुरूवारी कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे पथक कल्याण रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. त्यांना दोन इसम मोठ्या पिशव्या घेऊन स्कायवाॅकवरून जात असल्याचे दिसले. या पिशव्यांमध्ये संशयास्पद काही आहे का असा संशय आल्याने रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी त्यांना थांबून ठेवले आणि त्यांच्या जवळील पिशव्यांची तपासणी केली. त्या पिशव्यांमध्ये प्रतिबंधित राजश्री पान मसाला, रजनीगंधा, गोल्डन, तुलसी अशी गुटख्याची एकूण ११४ पाकिटे आढळून आली. या गुटख्याची बाजारातील किंमत ९९ हजार आढळून आली. पोलिसांनी या गुटख्यासह भिवंडीतील दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, रोहित सावंत, सुधाकार सावंत, संदीप गायकवाड, स्मिता वसावे यांच्या पथकाने केली.