कल्याण – दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या कल्याण शहरात शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा परिसरातून नागरिक वाहने घेऊन कुटुंबीयांसह आली आहेत. त्यात कल्याण शहरात मुख्य बाजारपेठ भागात स्मार्ट सिटी उड्डाण पूल, मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. रस्तोरस्ती नागरिक, दुकानदार यांची वाहने उभी असल्याने कल्याण शहर शुक्रवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीत अडकले. या वाहन कोंडीचा आचार्य अत्रे रंगमंदिरात रात्री साडे आठ वाजता होणाऱ्या लोक या सांगीतिक कार्यक्रमाच्या कलाकारांना फटका बसला.

या कार्यक्रमाचे कलाकार आणि त्यांची रंगमंच सजावटीची वाहने साडे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अत्रे रंगमंदिरात पोहचणे आवश्यक होते. परंतु, कल्याण शहर परिसरातील शिळफाटा रस्ता, मुरबाड रस्ता वाहतूक कोंडीने जाम आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम कल्याण शहरातील वाहन कोंडीवर झाला आहे. कल्याण शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील शिवाजी चौक, रेल्वे स्थानक भागातील वल्लीपीर रस्ता, मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता, शिवाजी चौक ते पत्रीपूल आणि शिवाजी चौक ते दुर्गाडी, लालचौकी रस्ते वाहतूक कोंडीने गजबजून गेले आहेत.

आचार्य अत्रे रंगमंदिर, अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक ते पारनाका चौक रस्ते संध्याकाळी सहा वाजल्यापासून वाहनांनी गजबजून गेले आहेत. अत्रे रंंगमंदिराच्या बाहेर आकाश कंदील, दिवाळी साहित्य विक्रेत्यांनी पदपथ आणि रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यापुढे खरेदीदारांची वाहने उभी आहेत. त्यामुळे अत्रे रंगमंदिर ते सुभेदारवाडा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना रस्ता नाहीच, पण चालायला पादचाऱ्यांना जागा नाही, अशी भयावह परिस्थिती आहे.

अत्रे रंगमंदिरातील सांगीतिक कार्यक्रम पाहण्यासाठी डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील काही हौशी नाट्य रसिक, सांगीतिक कार्यक्रमाचे चाहते कल्याणमधील वाहतूक कोंडीत अडकायला नको म्हणून साडे सात वाजताच दाखल झाले आहेत. परंंतु, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली परिसरातून येणाऱ्या काही चाहत्यांना कोंडीचा फटका बसला. कल्याण शहरातील रसिक वेळेत पोहचू म्हणून उशिरा निघाले तेही को्ंडीत अडकले.

सांगीतिक कार्यक्रमाचे काही कलाकार आणि त्यांची रंगमंच सजावटीची वाहने कल्याण शहर परिसरातील वाहतूक कोंडीत अडकली आहेत. आणि ती कार्यक्रमाची वेळ होत आली तरी पोहचली नसल्याने अखेर साडे आठ वाजण्याच्या दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजकांना कार्यक्रम थोडा विलंबाने सुरू होत असल्याची रंगमंचावरून घोषणा करावी लागली.

रंगमंच सजावट आणि कलाकार रंगमंदिरात नसल्याने अत्रे रंगमंंदिर व्यवस्थापनाने रसिकांना नाट्य सभागृहात सोडलेले नाही. कलाकार आणि रंगमंच सजावटीनंतर रसिकांना सोडण्यात येईल, असे प्रवेशव्दारावर रसिकांना सांगण्यात येत होते. कल्याण शहरातील दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. ही कधी कोंडी कधी सुटणार असे संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत. या कोंडीमुळे काही पालिका अधिकाऱ्यांनी आपली पालिका आवारात उभी करून पायी घरी जाणे पसंत केले असल्याचे समजते.