कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३१ शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शाळेची पटसंख्या न वाढविल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना मुख्याध्यापकांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा शिक्षण विभागातर्फे उगारला जाणार आहे.कल्याण डोंबिवली पालिकेच्या इतिहासात प्रथमच शिक्षण विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईने सुशेगात काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खासगी शाळा मे महिन्यापासून आपल्या शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. मग कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांना हे का जमत नाही, असे प्रश्न आता पालिकेत उपस्थित केले जात आहेत.

शिक्षण विभागाला आतापर्यंत स्वतंत्र उपायुक्त नव्हता. या विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त म्हणून संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिका शाळा सुस्थितीत करणे, तेथे पायाभूत सुविधा उभारणे, त्यांचा कायापालट करणे, शाळा चाळ, झोपडपट्टी भागात असली तरी तेथे शालेय वातावरण राहील यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी पालिका शाळांमधील मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी ताकीद मे महिन्यात शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी पालिका शाळांमधील ६१ मुख्याध्यापकांना दिली होती.

पालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते. शासनाचे शिक्षण विषयक सर्व उपक्रम पालिका शाळांमध्ये राबविले जातात. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवसात शालेय साहित्य, पुस्तके, वह्या, गणवेश वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. हे पालकांच्या मनावर बिंबवून आपल्या शाळा परिसरातील विद्यार्थी, शाळा बाह्य विद्यार्थी यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करा, असे उपायुक्त जाधव यांनी मुख्याध्यापकांना सुचविले होते.

शाळा सुरू होऊन आता महिना झाल्यानंतर उपायुक्त जाधव यांनी पालिका ६१ शाळांचा आढावा घेतला. कोणत्या शाळेत किती पटसंख्या वाढवली याची माहिती घेतली. यामध्ये काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न करून विद्यार्थी पटसंख्या वाढवली. काही शाळांनी एकही विद्यार्थी शाळेत वाढविला नाही. पटसंख्या वाढवण्यात कमी पडले म्हणून उपायुक्त जाधव यांनी पालिकेच्या ३१ शाळांमधील मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.जाधव यांनी पदभार स्वीकारल्यापासून पालिक शाळांचे चित्र बदलण्यास सुरूवात झाली आहे. पालिका शाळांमध्ये सुमारे साडे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी पालिकेच्या ७४ शाळा आणि सुमारे ५० हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. विद्यार्थी सर्वांगिण विकासाचे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना पटसंख्या वाढविण्यासाठी सूचित केले होते. अनेक शाळांनी ही संख्या न वाढविल्याने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.संजय जाधव उपायुक्त, शिक्षण विभाग.