कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात फार्मासिस्ट म्हणून नोकरीत असुनही डोंबिवलीतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेजमधील वास्तु सृष्टीमधील आपल्या मालकीचा गाळा पालिकेला आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने दिला. पालिकेतून वेतन आणि गाळ्याच्या माध्यमातून दुहेरी आर्थिक लाभ घेणाऱ्या फार्मासिस्ट अनिल वसंतराव शिरपूरकर यांच्या संबंधीचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी पालिका वरिष्ठांना सादर केला.
पालिका सेवेत नोकरी करत असुनही आपल्या मालकीचा गाळा पालिकेला आरोग्यवर्धिनी केंद्राला भाड्याने देऊन फार्मासिस्ट शिरपूरकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा व वर्तणूक नियमातील ‘ऑफिस ऑफ प्राॅफिट’ कायद्याचा भंग केला आहे. शिरपूरकर यांनी उघडपणे दुहेरी लाभ घेतला आहे हे माहिती असुनही मागील पाच महिन्याच्या काळात आरोग्य विभागातील वरिष्ठांनी फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्याविषयी बोटचेपी भूमिका घेतली. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीला आणले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांच्याकडे फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्या दुहेरी लाभ घेतल्याप्रकरणी अहवाल मागविला. नंतर हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.
काय आहे अहवालात
आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल, १५ वा वित्त आयोग समन्वयक अधिकारी डाॅ. प्रज्ञा टिके यांच्या स्वाक्षरीने फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर यांचा चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल गोपनीय असला तरी त्याची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. पालिका क्षेत्रात ३५ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, पाच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी ४० केंद्रे आहेत. ३७ केंद्रे पालिकेच्या जागेत, पाच केंद्रे भाडेतत्वावरील जागेत आहेत.
डोंबिवलीतील भोपर येथील आरोग्यवर्धिनी केंद्र देसलेपाडा येथील लोढा हेरिटेजमधील वास्तु सृष्टी इमारतीत एका गाळ्यात आहे. धीरजकुमार पांडे यांच्या मालकीच्या गाळ्याचे ३०० चौरस फूट क्षेत्र, फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्या २५० चौरस फूट क्षेत्र एकत्रित करून हे केंद्र चालविले जाते. मागील २३ महिन्यात या गाळ्याच्या माध्यमातून दरमहा ३१ हजार ७४१ रूपये भाडे संयुक्तपणे दोन्ही गाळेधारकांना देण्यात आले आहे.
या गाळ्याच्या भाडयाचे मार्च २०२६ पर्यंत नुतनीकरण करण्यात आले आहे. हे भाडे शिरपूरकर आणि पांडे यांच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँकेतील संयुक्त खात्यात जमा केले जाते. याप्रकरणात राष्ट्रीय बहुजन प्रेमी संस्थेचे गणेश ताटे यांनीही शिरपूरकर यांनी ऑफिस ऑफ प्राफिट कायद्याचा भंग केला म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
बडतर्फ करा
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक १९७९ कलम १६ मध्ये ‘कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने शासनाची पूर्वमंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही धंदा, व्यापारात गुंतणार नाही किंवा दुसरी कोणतीही नोकरी स्वीकारण नाही’ अशी तरतूद आहे. तरीही फार्मासिस्ट शिरपूरकर यांनी आपला गाळा पालिकेला आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी भाड्याने दिला. त्या माध्यमातून व्यापार-धंदा करून दुहेरी आर्थिक लाभ घेतला आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांंनी आयुक्तांकडे केली आहे. या कलमाने पालिकेतील साहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना पालिकेने यापूर्वी सेवेतून बडतर्फ केले आहे.
