कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ठाणे महापालिकेप्रमाणे करोना साथीने शिरकाव केला आहे. करोना साथीने आजारी असलेल्या येथील एका महिलेचा एका रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या महिलेचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिचा मृत्यू करोनाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ.दीपा शुक्ल यांनी माध्यमांना दिली.
पालिका हद्दीत एकूण चार नागरिकांना करोना साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांमधील उपचार सुरू असताना एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्या एका रुग्णाची लक्षणे सौम्य असल्याने त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. अन्य एक बाधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. चौथा रुग्ण अधिक उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, अशी माहिती डाॅ. दीपा शुक्ल यांनी माध्यमांना दिली.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोना साथीचा शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. गर्दीच्या,बंदिस्त ठिकाणी विविध प्रकारच्या सह व्याधी असलेल्या व्यक्ति, वृध्द यांनी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा प्राधान्याने वापर करावा. शिंंकताना, खोकताना रुमाल किंवा प्रतिबंधित वस्तूचा वापर करावा. रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिका इतर कर्मचाऱ्यांनी मुखपट्टीचा प्राधान्याने वापर करावा. हाताची स्वच्छता राखणे खूप महत्वाची आहे. आपण बाहेर बाजारात वस्तुला कोठे हात लावला असेल तर हात स्वच्छ धुण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा खवखवणे, श्वसनास त्रास होत असेल तर तात्काळ आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
करोना चाचणी प्राधान्याने करून घ्यावी. श्वसन विकारान ग्रस्त अन्य व्यक्तिंच्या संपर्कात जाणे टाळावे. करोना उपचार आणि निदानाची सर्व वैद्यकीय सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. कल्याणमध्ये पालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय येथे करोना विलगीकरण कक्षाची तयारी करण्यात आली आहे. प्राणवायुची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करोनासाठी करण्यात येणाऱ्या जीभेच्या चाचण्यांची सुविधा पालिकेच्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.
करोनाच्या तपासणीसाठी कल्याणमध्ये गौरीपाडा येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा उपलब्ध आहे. करोना साथीची लक्षणे दिसून आल्यास संबंधिताने तात्काळ पालिका, आपल्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करून घ्यावेत. अशा रुग्णांनी स्वताला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे करण्यात आले आहे.