कल्याण – कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर गौरीची फुले (शेंदुर्ली, कळलावी) खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. विशेष करून महिला वर्ग गौरीची फुले, गौरीच्या प्रसादासाठी लागणारी रानभाज्यांची खरेदीसाठी बाजारात अधिक संख्येने आल्या आहेत. गौरीच्या फुलांची एक जुडी दीडशे रूपयांना विकली जात आहे.
डोंबिवलीत पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बदलापूर, मलंगगड परिसरातील गावे, भिवंडी जवळील पिंपळास परिसरातील गावांमधून महिला गौरीची फुले, केळीची पाने, अळुची पाने, गौरीला प्रसादासाठी लागणाऱ्या रानभाज्या घेऊन बाजारात दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात केळीच्या पानावरील भोजनाला नागरिक अधिक पसंती देतात. त्यामुळे बाजारात केळीची पाने ५० रूपयांना तीन या दराने विकली जात आहेत. यावेळी मुसळधार पाऊस असल्याने केळींचा पानांचा फुटवा जंगलात झाला नाही. त्यामुळे या वर्षी केळीच्या पानांचा जंगलात तुटवडा असल्याची माहिती गावाकडून आलेल्या महिला विक्रेत्या देतात.
गौरीच्या फुलांना शेंदुर्ली, कळलावी अशीही नावे आहेत. कल्याण, डोंबिवलीत गौरीची फुले, त्यांचा वेल आणि त्यामध्ये मंगळगौरीची फुले असा जुडगा १५० रूपयांना विकला जात आहे.
प्राणप्रतिष्ठेसाठी गौरीच्या प्रतिमे बरोबर गौरीची आवडती फुले पुजली जातात. त्यामुळे महिला वर्ग ही ताजी फुले खरेदीसाठी बाजारात अधिक प्रमाणात दिसत आहे. याशिवाय अळुची पाने भोजनासाठी गणपती, गौरीसाठी महत्वाची मानली जातात. त्यामुळे अळुच्या पानांना बाजारात अधिक प्रमाणात मागणी आहे.
अळुच्या वड्या पानांची स्वतंत्र खरेदी केली जात आहे. अळुच्या पानांचा जुडवा २० ते ३० रूपयांना विकला जात आहे. ग्रामीण भागात आदिवासी भागातील महिला गौरीची फुले, अळुची पाने, शेंदुर्लीची फुले घेऊन विक्रीसाठी आल्या आहेत. या महिलांकडून गौरीची फुले ५० रूपये जुडीप्रमाणे विकली जात आहेत. अळुची पाने २० रूपये जुडीप्रमाणे विकली जात आहेत. याशिवाय गावरान पिकवलेली काकडी, भेंडी, शिराळी, करटोली बाजारात विक्रीसाठी आली आहेत.
या सणांच्या काळात केळीची पाने, गौरीची फुले, भाजीपाला या माध्यमातून आम्हाला अधिकचे पैसे मिळतात. यासाठी आम्हाला जंगलात जाऊन मेहनत घ्यावी लागते. रानात गेल्यानंतर तेथील जंगली कीटक शरीर टोचून काढतात, असे बदलापूर कोंडेश्वर भागातून आलेल्या हिराबाई या महिलेने सांगितले.