लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: दोन दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर ठेकेदाराकडून खडी काही ठिकाणी काँक्रीट टाकून खड्डे बुजविण्याची कामे वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

मागील दोन महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गावांच्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत. मुसळधार पाऊस सुरू असल्याने खड्डे भरणीची कामे प्रभावीपणे करता येत नाहीत, अशी कारणे ठेकेदारांकडून देण्यात येत होती. एकाही रस्त्यावर खड्डा दिसता कामा नये. अन्यथा संबंधित ठेकेदार, नियंत्रक अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असे इशारे आयुक्त, शहर अभियंत्यांनी दिले. तरीही रस्त्यावरील खड्डे काही कमी झाले नाहीत किंवा एकाही ठेकेदार, अभियंत्यावर कारवाई झाली नाही.

हेही वाचा… डोंबिवलीत पदपथ अडविणाऱ्या दुकान, गॅरेज चालकांवर कारवाई, ग प्रभागाची आक्रमक कारवाई

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्या जवळील रस्ता, गोविंदवाडी रस्ता, मोहने, आंबिवली, टिटवाळा, बल्याणी रस्ता, पूर्व भागातील मलंगगड, चिंचपाडा, डोंबिवली एमआयडीसीतील डांबरी रस्ते, मानपाडा रस्ता, गणेशनगर रस्ता, आयरे रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मलंगगड रस्त्यावर काही दिवसापूर्वी एका दुचाकी स्वाराचा खड्डा चुकवित असताना डम्पर खाली येऊन मृत्यू झाला होता. खड्ड्यांमुळे रिक्षा चालक, दुचाकी स्वार, प्रवासी हैराण आहेत. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने २० कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे.