कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेचा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आणि सभागृह कर्मचाऱ्यांनी खचाखच भरले नसल्याने नाईलाजाने प्रशासनाला रद्द करावा लागला होता. हाच कार्यक्रम आता गुरुवारी, ता. ३० रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात दुपारी पावणे तीन वाजता पालिका प्रशासनाने घेण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाला सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी हजर होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद त्यांचे विभागप्रमुख घेतील. जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित न राहणाऱ्या किंवा कार्यालयात उपस्थित आहेत, पण वर्धापनदिन कार्यक्रमाकडे न फिरकणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठांकडे सादर केली जाणार आहे. या आदेशामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या गुरुवारच्या ४२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांची भरगच्च उपस्थिती असेल यादृष्टीने विभागप्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कठोर शब्दात सुनावून हजर राहण्याची तंबी दिली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी पालिकेने आपला वर्धापनदिन कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते. १ ऑक्टोबर हा पालिकेचा वर्धापनदिनाचा दिवस. या दिवसाच्या कालावधीत धाराशिव येथील जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात नृत्य करत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली. त्याच दरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेचा वर्धापनदिन होता. असे काही नृत्य करताना दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली तर नाहक कटकट नको म्हणून पालिकेच्या वरिष्ठांनी हा कार्यक्रम सुरूवातीला घेणे टाळले.

मग, पालिकेने १५४ कर्मचाऱ्यांना दिलेल्या पदोन्नत्तीचे निमित्त साधून पदोन्नत्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांंचा गुणगौरव सोहळा या शीर्षकाखाली हा वर्धापनदिन सोहळा घेण्याचे निश्चित केले. या सोहळ्याच्या दिवशी तुफान पाऊस होता. संध्याकाळच्या वेळेत हा कार्यक्रम होता. त्यामुळे बहुतांशी कर्मचाऱ्यांंनी घरी जाणे किंवा कार्यालयात बसून राहणे पसंत केले. आयुक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु, कार्यक्रमाची वेळ संपून एक तास झाला तरी अत्रे सभागृह कर्मचाऱ्यांनी भरले नाही.

मग, आयुक्तांना तातडीने मुंबईत एका कार्यक्रमाला जावे लागले असे निमित्त काढून वर्धापनदिनाचा कार्यक्रम पालिकेला रद्द करावा लागला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची सभागृहात उपस्थिती नाही म्हणून कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याची खंत सभागृहात कार्यक्रम रद्द करतानाची घोषणा करताना व्यक्त करावी लागली होती. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी स्वतासह सहकर्मचाऱ्यासह वर्धापनदिन कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश काढला आहे.