या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण डोंबिवलीच्या बाह्य़वळण रस्त्यावर अतिक्रमणे, जमीन संपादन, कचराभूमी, ‘सीआरझेड’चा तिढा

कल्याण डोंबिवली शहरांच्या बाहेरून तयार होणाऱ्या प्रस्तावित बाह्य़वळण (रिंग रोड) रस्त्याच्या मार्गात ३५६ अनधिकृत बांधकामे आणि ६४६ झाडे आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिली आहे. तसेच या रस्त्यावरील सर्व बेकायदा बांधकामे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर तोडून टाकण्यात येणार असून मार्गातील झाडांचे योग्य पुनर्वसनदेखील करण्याची हमी प्रशासनाने ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

वाहतूक कोंडीने गजबजलेल्या कल्याण डोंबिवली शहरांची कोंडीतून मुक्तता करावी म्हणून पालिकेने डोंबिवलीजवळील भोपर, कोपर, मोठागाव, रेतीबंदर, देवीचा पाडा, गरिबाचा वाडा, कुंभारखाण पाडा, ठाकुर्ली पश्चिम ते कल्याणमधील पत्रीपूल, दुर्गाडी पूल, आधारवाडी क्षेपणभूमी ते गंधारे उड्डाणपूल ते टिटवाळा अशा सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या बाह्य़वळण रस्त्याची आखणी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा रस्ता तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र निधीच्या उपलब्धतेमुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी होत नव्हती. सुरुवातीला सुमारे नव्वद कोटींचा हा प्रकल्प आता वाढत्या किमतींमुळे ३९० कोटींचा झाला आहे. ‘एमएमआरडी’च्या पुढाकारातून पालिकेने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या कामांचा शुभांरभ माणकोली व गंधारे उड्डाणपुलांदरम्यान होणार आहे. २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सद्य:स्थिती, तेथील अतिक्रमणे व  येणाऱ्या अडचणीचा सोडविण्यासाठी आयोजित बैठकीत प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे, अधीक्षक अभियंता वारसकर, कार्यकारी अभियंता जे. आर. ढाणे, पालिका आयुक्त ई. रवींद्रन, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, साहाय्यक संचालक प्रकाश रविराव उपस्थित होते.

प्रकल्पासमोरील आव्हाने

* रस्त्याच्या मार्गातील ३५६ बेकायदा बांधकामे

* रस्ता तयार करताना मार्गातील ६४६ झाडांचे पुनर्वसन

* अतिक्रमणांनी बाधित १२२ एकर जमीन संपादित करण्याचे मोठे आव्हान

* आधारवाडी क्षेपणभूमीचा १५ मीटर उंचीचा कचऱ्याचा थर

* भोपर, संदप, नांदिवली परिसरातील गावांचा या रस्त्याला विरोध असल्याने येथील सर्वेक्षण व जमीन संपादन करणे.

* ‘सीआरझेड’मधील ८२ एकर जमिनीचा तिढा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation kalyan dombivli ring road kalyan dombivali traffic
First published on: 18-02-2017 at 02:54 IST