कल्याण : लोकसभा निवडणुकीच्यावेळी गेल्या वर्षी कल्याण ग्रामीण मतदारसंघात कट्टर विरोधक असुनही दिलजमाईने मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान, रात्रीचा दिवस केला होता. विधानसभा निवडणुकीच्यावेळी खासदार शिंदे यांच्यासह शिंदे शिवसेनेची साथ आपणास मिळेल अशी गणिते करून आपल्या विधानसभा विजयाची गणिते राजू पाटील यांनी पाहिली होती.
पण त्यानंतर चक्र फिरले आणि राजू पाटील यांनी केलेल्या मदतीची जाण न ठेवता शिंदे शिवसेनेने ताकदीने माजी नगरसेवक राजेश मोरे कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांच्या विरोधात उभे करून राजू पाटील यांच्या लोकसभेतील मदतीवर बोळा फिरवला.
या सगळ्या प्रकाराने हैराण झालेल्या राजू पाटील यांनी शिंदे पिता -पुत्रांना जाहीर सभेत गद्दार शब्द वापरून आपली अस्वस्थता दाखवून दिली होती. लोकसभा निवडणुकीच्यावेळी जुने वाद विसरून राजू पाटील यांनी खासदार शिंदे यांच्या विजयासाठी अटोकाट प्रयत्न केले. आपली मनसेची फळी कामाला लावली. विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पूर्ण ताकद लावू आणि तुमची कल्याण ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी साहाय्यक करू, असा शब्द राजू पाटील यांना शिंदे शिवसेनेकडून मिळाला होता. या शब्दावर विश्वास ठेऊन राजू पाटील लोकसभा निवडणुकीच्यावेळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे करवलीसारखे उभे होते.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांना साहाय्य करण्याऐवजी कल्याण ग्रामीणमध्ये वलय नसताना अचानक शिंदे शिवसेनेने आपले खास समर्थक माजी नगरसेवक राजेश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला. त्याच बरोबर राजू पाटील यांचा विश्वासघात केला. राजेश मोरे यांच्या विजयासाठी आणि राजू पाटील यांच्या पराभवासाठी शिंदे शिवसेनेने पूर्ण ताकद राजेश मोरे यांच्या पाठीशी उभी केली. मतदानाच्या तीन दिवस अगोदर खासदार शिंदे कल्याण ग्रामीणमध्ये तंबू ठोकून होते.
लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांना केलेल्या मदतीचा वचपा काढण्यासाठी राजू पाटील मागील काही महिन्यांपासून संधी शोधत होते. गेल्या वर्षभरापासून ते विकास कामे, नागरी समस्यांवरून दररोज शिंदे पिता पुत्रांना समाज माध्यमांतून लक्ष्य करत आहेत. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी ही चांगली संधी आहे असा विचार करून मनसेने भाजप बरोबर गूळपीठ सुरू केली असल्याची चर्चा आहे. चार सदस्य प्रभाग पध्दतीत प्रत्येक ठिकाणी मनसेचा प्रभाव नाही. त्यामुळे आहे त्या प्रभागात ताकद लावून भाजपची साथ घेऊन शिंदे शिवसेनेला शह देण्याच्या हालाचाली भाजप, मनसेकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी आपल्या गळाला लागतील यासाठी शिंदे शिवसेनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आपल्या नेत्याच्या इशाऱ्यावर सर्व काही अवलंबून असल्याने शिंदे शिवसेनेच्या गळ्याला मनसेचा एकही नगरसेवक, पदाधिकारी लागत नसल्याची माहिती आहे. पालिका निवडणुकीच्या काळात मैत्रीपूर्ण लढतीमधून मनसे, भाजपने शिंदे शिवसेनेला खिंडीत गाठायच्या खल सुरू असल्याचे समजते. या विषयावर मनसे, भाजपकडून उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही.
