कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ आणि वसार गाव हद्दीत भूमाफियांनी मोकळ्या माळरानावर मागील महिनाभरात ४० बेकायदा चाळींची उभारणी केली होती. याशिवाय पाऊस सुरू झाल्यानंतर बेकायदा चाळींची उभारणी करण्यासाठी २० हून अधिक जोत्यांची बांधकामे करून ठेवली होती. या बेकायदा चाळी, जोत्यांची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभाग अधिकाऱ्यांना समजताच पाऊस सुरू असतानाच तोडकाम पथकाने या बेकायदा चाळी, जोत्यांची कामे भुईसपाट केली.

कल्याण पूर्वेतील आय प्रभाग हद्दीतील बेकायदा चाळी, आशेळे, माणेरे, चिंचपाडा भागातील जीन्सचे बेकायदा प्रदुषणकारी कारखाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मागील आठ महिन्याच्या कालावधीत भुईसपाट केले आहेत. प्रभागात एकही बेकायदा बांधकाम होणार नाही असे नियोजन आय प्रभागाने केले आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत भूमाफियांनी वसार गाव हद्दीत पालिकेला सुट्टी असेल त्या कालावधीत घाईघाईने ३२ चाळींची बांधकामे उभी केली होती. या चाळींच्या बांधकाम परिसरात आठ नवीन जोत्यांची बांधकाम करून ठेवली होती. अशीच बेकायदा चाळींची बांधकामे माफियांनी नांदिवली येथे केली होती. नांदिवली तर्फ गाव हद्दीत भूमाफियांनी आठ बेकायदा चाळी आणि सात नवीन चाळी उभारणीसाठी जोत्यांची बांधकामे केली होती.

प्रभाग हद्दीत कुठेही पावसाचे पाणी तुंबणार नाही. अतिधोकादायक इमारती प्रभागात असतील तर त्यांची पाहणी, नाले, गटार सफाईंची कामे प्रभागात योग्यरितीने झाली आहेत की नाही याची पाहणी करण्याचे निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी दहा प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह आय प्रभागात पाहणी करत असताना त्यांना वसार आणि नांदिवली तर्फ गाव हद्दीत नव्याने बेकायदा चाळी आल्या आहेत, जोती बांधण्यात आली आहेत, असे पाहणीच्या दरम्यान निदर्शनास आले.

साहाय्यक आयुक्त पवार यांनी या बांधकामांच्या ठिकाणी जाऊन ही बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे कोणी केली आहेत याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना परिसरातील कोणीही नागरिक माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. चाळी, जोत्यांची बांधकामे बेकायदा आहेत याची खात्री पटल्यावर साहाय्यक आयुक्त पवार यांनी ही सर्व बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस सुरू असताना साहाय्यक आयुक्त पवार पोलीस बंदोबस्तात वसार, नांदिवली तर्फ भागात तोडकाम पथकासह पोहचले. सोबत जेसीबी होता. तोडकाम पथकाच्या साहाय्याने साहाय्यक पवार यांनी दोन्ही गाव हद्दीतील बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे मुसळधार पावसात जमीनदोस्त केली. कारवाई सुरू असताना कोणीही भूमाफिया विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. या कारवाईने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.