कल्याण – सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात एकूण सहा हजार ३७८ ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दोन हजार ८९७ ठिकाणी रास दांडिया खेळला जाणार आहे. अशिया खंडातील सर्वात मोठा वातानुकूलित मंडपातील दांडिया डोंबिवलीत भाजपतर्फे सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आला आहे. त्याच बरोबर शिंदे शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे डोंबिवलीत ध. ना. चौधरी विद्यालयाच्या मैदानावर रासरंग दांडिया आयोजित करण्यात आला आहे.

दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवा दरम्यान कल्याण-डोंबिवलीत एकूण ६ हजार ३८७ ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुर्गामातेच्या ३३ मंदिरांसह २ हजार ८९७ ठिकाणी रास दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची देवीच्या आगमन, मंडप सजावटीची जोरदार तयारी आहे. त्याच बरोबर पावसाचे मोठे संकट समोर उभे असल्याने आकाशातील काळे ढग कार्यकर्त्यांची धडकी वाढवत आहेत.

भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात, दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात, आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात, असे शास्त्राकार सांगतात. चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. यंदाची नवरात्री १० दिवसांची आहे. अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित वातानुकूलित मंडपातील दांडिया दीड लाख चौरस फुटाच्या मंडपात खेळला जाणार आहे. कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी या मंडपाची उभारणी केली आहे. यंदा प्रथमच मुख्य मंडपाच्या बाहेर दोन्ही बाजुला २५ हजार चौरस फुटीचा दोन खुल्या मंडपातील दांडियासाठी दालने करण्यात आली आहेत. ६५ मीटर बाय ४० मीटर आकाराचा वाद्यवृंद आणि गायकांसाठी मंडपात व्यासपीठ आहे.

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २, डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४, विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ९, तर खासगी १० आणि टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ अशा एकूण अंबा/दुर्गा मातेच्या ३३ मंदिरांमध्ये नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी १४३, खासगी ठिकाणी २६२४ अशा एकूण २७६७ दुर्गा मातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक ६३, तर खासगी ६७ अशा १३० ठिकाणी दुर्गा मातेच्या प्रतिमांची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक १५ आणि खासगी ३४४२ अशा एकूण ३४५७ ठिकाणी घटांची स्थापना करण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीमध्ये एकूण आठ पोलीस ठाणी आहेत. या आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये नवरात्रौत्सव दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडून कायदा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुमारे सातशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहती उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.