कल्याण – पडघा पाल येथील उच्च दाब विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत कल्याण पूर्व, डोंबिवली शहर, शिळफाटा, २७ गाव परिसराचा वीज पुरवठा चार तास बंद पडला. अचानक वीज पुरवठा बंद पडल्याने स्थानिक महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

रविवार सुट्टीचा दिवस. त्यात घरात वीज नसल्याने रहिवासी त्रस्त झाले होते. स्थानिक महावितरण कार्यालयात संपर्क करून, प्रत्यक्ष जाऊन वीज पुरवठा कधी पूर्ववत होईल याची विचारणा नागरिक करत होते. पण हा वीज पुरवठा भिवंडी पडघा येथील वीज पुरवठा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीत बिघाड झाल्याने बंद पडला आहे, अशी उत्तरे महावितरण कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना देत होते.

अंबरनाथ येथील पाल गाव हद्दीतील महावितरणच्या पाल उपकेंद्राला पडघा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या उच्च दाब वीज वाहिन्या रविवारी पहाटेच्या वेळेत तुटल्या. त्यामुळे पाल उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा खंडित झाला. पाल उपकेंद्रातून कल्याण पूर्व, डोंबिवली शहर आणि परिसराला वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे या शहरांचा वीज पुरवठा ठप्प झाला. उच्च दाब वीज वाहिन्या तुटल्याचे समजताच पारेषण विभागाच्या अभियंत्यांनी तात्काळी तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्याचे आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले.

सकाळीच वीज पुरवठा बंद पडल्याने रविवारी सकाळी कल्याण डोंबिवली पालिकेकडून घरांमध्ये येणारी पाणी येऊ शकले नाही. इमारतीच्या तळाच्या टाकीतून इमारतीवरील टाकीत पाणी चढवता आले नाही. त्यामुळे रहिवाशांना दुपारच्या पाण्यासाठी ताटकळत राहावे लागले. नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा कधी येईल म्हणून हैराण केले. अखेर महावितरणने ग्राहकांना लघुसंदेश पाठवून वस्तुस्थितीची माहिती दिली. अखेर दहा वाजण्याच्या दरम्यान वीज पुरवठा पूर्ववत झाला.