कल्याण – कल्याण शहर परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे सकाळपासून कल्याण शहरातील रस्ते कोंडीने जाम असतात. या समस्यांवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने संतप्त झालेल्या कल्याण शहरातील सुमारे दोन हजार पाचशे रिक्षा चालकांनी सोमवारी (ता. १८) कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागातील मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक येथे सकाळी साडे अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, डोंबिवली पश्चिम, पूर्वेतील काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने डोंबिवलीतील रिक्षा संघटना पालिकेच्या निषेधार्थ आंदोलनाची तयारी करत आहेत.
रिक्षा चालक मालक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी यांना आंदोलना संदर्भात एक पत्र दिले आहे. गेल्या महिन्यात शहरातील रस्ते सुस्थितीत करावेत अशा आशयाचे पत्र देऊन सुध्दा आपण आमच्या पत्राची दखल घेतली नाही. कल्याण शहर परिसरातील रस्ते, उड्डाण पुलांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. खड्ड्यात रिक्षा सतत आपटून रिक्षा चालकांच्या रिक्षेचे सुट्टे भाग खिळखिळे होत आहेत. या खड्ड्यांचे फटके बसून अनेक रिक्षा दररोज बंद पडत आहेत. रिक्षा चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांना कंबर, मणका दुखीचे त्रास सुरू झाले आहेत असे पेणकर यांनी पत्रात म्हटले आहे.
कल्याण शहरात बैलबाजार ते शिवाजी चौक भागात मेट्रो मार्गाची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे रस्ते अरूंद झाल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वे स्थानक भागातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्यांवर चिखल, दलदल झाली आहे. रिक्षा वाहनतळांसाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. प्रवाशांना रस्त्यावरून चालणे अवघड होत आहे. कल्याण ते उल्हासनगर दरम्यानच्या वालधुनी पुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी पालिका हद्दीतून हा रस्ता जातो.
कल्याण, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगरकडे जाणारी वाहने या रस्त्यावरून, पुलावरून धावतात. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावत असल्याने वालधुनी पूल भागात सतत कोंडी असते. पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलावरील खड्डे बुजविणे आणि रस्ता सुस्थितीत करण्यासाठी पाठपुरावा करावा. कल्याण शहरातील कोंडीचा शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक यांना सर्वाधिक फटका बसत आहे. खड्डे आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नाही हे दिसत असल्याने पालिकेचा निषेध करण्यासाठी येत्या सोमवारी (ता.१८) आम्ही मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक येथे आंदोलन करत आहोत. आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या पत्रावर कार्याध्यक्ष संतोष नवले, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सचिव विलास वैद्य यांच्यासह शगीर शेख, प्रताप सरोदे, आबा भसमारे, रिजवान शेख, विजय डफळ, चंद्रशेखर नवले, अनिल जगताप, प्रवीण वासनिक यांनी सह्या केल्या आहेत.