कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) पालिका हद्दीतील सर्व शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांची कत्तल करणारे कत्तलखाने १४ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन रोजी रात्री १२ या चोवीस तासाच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत येत्या शुक्रवारी मटण विक्री दुकानांमध्ये कोंबड्या, शेळी, मेंढ्याच्या मटणाचा खडखडाट असणार आहे.

कल्याण डोंंबिवली पालिका बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी १९ डिसेंबर १९८८ च्या प्रशासकीय ठरावाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने चालक, मटण विक्री चालकांना बारा दिवस अगोदरच पालिकेच्या या निर्णयाची माहिती व्हावी म्हणून सोमवारीच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पालिका हद्दीतील शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांची कत्तल करणाऱ्या कत्तलखाने चालकांना पालिकेच्या बाजार व परवाना विभागाने नोटिसा पाठवून कत्तलखाने १५ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

१४ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १५ ऑगस्ट रोजी रात्री १२ या कालावधीत कत्तलखाने बंद राहणार असल्याने शुक्रवारी संपूर्ण दिवस मटण विक्रीच्या दुकानांमध्ये सर्व प्रकारच्या मटणांचा खडखडाट असणार आहे. या कालावधीत कोणीही कत्तलखाना चालकाने गुपचूप कत्तलखाना सुरू ठेवला किंवा कोणा मटण विक्रेत्यांनी चोरूनलपून मटण विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्या कत्तलखाना चालक आणि मटण विक्रेत्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३३४, ३३६, व ३७४(ब) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसा इशारा उपायुक्त कांचन गायकवाड यांनी कत्तलखाने चालक आणि पालिका हद्दीतील मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांना दिला आहे.

आता श्रावण सुरू असला तरी अनेक नागरिक बुधवारी, शुक्रवार आणि रविवारी हमखास मटणावर ताव मारतात. १५ ऑगस्ट रोजी शुक्रवार असल्याने मटण खाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. शासन आदेशाप्रमाणे वर्षभरात महावीर जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र दिन आणि इतर महत्वांच्या दिवशी शहरातील मांस, मटण विक्री करण्याची दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्या आदेशाप्रमाणे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मटण विक्री बंदच्या दिवशी काही विक्रेते शहराच्या बाहेरील झाडाझुडपांचा आधार घेऊन तेथे शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांची कत्तल करून मटण विक्री करण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर पाळत ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.