कल्याण – कल्याण पश्चिमेतील जुना आग्रा रस्त्यावर सहजानंद चौक ते गणपती चौक दरम्यान रविवारी सकाळी आधारवाडी भागात अन्नपूर्णानगरमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या ७० वर्षाच्या वृध्दाला एका भामट्या तोतया पोलिसाने लुटले. या तोतया पोलिसाने हेतुपुरस्कर वृध्दाला धक्का दिला आणि स्वत:चा मोबाईल जमिनीवर टाकून त्याची भरपाई वृध्दाकडे मागू लागला. या बोलाचालीत तोतया पोलिसाने वृध्दा जवळील मोबाईल आणि सोन्याची अंगठी काढून घेऊन रिक्षासह पळ काढला.

तक्रारदार प्रमोद भास्कर जोशी (७०) हे आधारवाडी भागातील अन्नपूर्णानगर मधील कालभैरव मंदिराजवळील सर्वोदय ओनिक्स सोसायटीत आपल्या कुटुंबीयांंसह राहतात. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता ते बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर ते पायी शिवाजी चौकातून आधारवाडी दिशेने चालले होते. सहजानंद चौक ते गणपती चौक दरम्यान शू माॅल दुकानासमोरून जात असताना त्यांना समोरून पायी येत असलेल्या ४० वर्षाच्या इसमाने जोराचा धक्का दिला.

या धक्क्यामध्ये समोरून येणाऱ्या इसमाने प्रकाश जोशी यांना धक्का मारून हेतुपुरस्सर स्वताचा बनावट मोबाईल रस्त्यावर टाकला. तुमच्यामुळे माझा मोबाईल जमिनीवर पडून फुटला आहे. त्याची भरपाई देण्याची मागणी दटावणीच्या भाषेत इसम प्रकाश जोशी यांना करू लागला. मी पोलीस आहे. तुम्ही भरपाई दिल्या शिवाय मी तुम्हाला येथून जाऊन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका तोतया पोलिसाना घेतली. हा सगळा प्रकार पाहून ज्येष्ठ प्रकाश जोशी घाबरले.

आपण तुम्हाला काहीही केले नाही. उलट तुम्हीच मला धक्का मारला आहे, असे प्रकाश जोशी त्याला सांगत होते. तेवढ्यात तोतया पोलिसाने एका रिक्षा चालकाला इशारा करून बोलावून घेतले आणि प्रकाश जोशी यांना आपण आता मोबाईलच्या दुकानात जाऊ. तेथे तुम्ही मला भरपाई द्या, असे तोतया पोलीस प्रकाश यांना सांगू लागला. भरपाईच्या विषयावर तोतया पोलीस प्रकाश जोशी यांच्याशी वाद घालत असताना त्याने प्रकाश जोशी यांना भुरळ घालून त्यांच्या हाताच्या बोटामधील सोन्याची अंगठी, हातामधील मोबाईल काढून घेतला.

जबरदस्तीने प्रकाश जोशी यांना रिक्षात बसवून आपण आता मोबाईल गॅलरीत चाललोय असे सांगू लागला. रिक्षा गांधारी रस्त्याने चालली होती. प्रकाश जोशी आपली अंगठी, मोबाईल मला परत करा, असे सतत तोतया पोलिसाला सांगत होते. भुरटा चोर ऐकत नव्हता. गांधारी रस्त्याने रिक्षा जात असताना तोतया पोलिसाने आता मी तुमचा मोबाईल आणि अंगठी रस्त्यावर फेकत आहे. ते तुम्ही उचला आणि घेऊन जा, असे बोलू लागला.

भुरट्याने आपण दोन्ही वस्तू रस्त्यावर फेकत आहे असा देखावा निर्माण केला. त्याने सोन्याची अंगठी हातात ठेवली आणि मोबाईल रस्त्यावर फेकला. तेथे प्रकाश जोशी यांना रिक्षेतून उतरवून तो सोन्याची अंगळी घेऊन रिक्षासह पळून गेला. रस्त्यावर इसमाने फक्त मोबाईल फेकला. अंगठी कोठेच आढळली नाही. त्यामुळे आपणास भेटलेला इसम हा चोरटा असल्याची खात्री पटल्यावर प्रकाश जोशी यांंनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड तपास करत आहेत.