कल्याण – दुकानदाराने ५० रूपये देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका गर्दुल्ल्याने हातामधील धारदार चाकुने एका दुकानदारावर हल्ला करून त्यांना गंंभीर जखमी केले आहे. इतर साथीदार गर्दुल्ल्यांनी दुकानदाराला मारहाण केली. गुरुवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय रस्त्यावर एका दुकानात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे दुकानदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हल्लेखोर गर्दुल्ला हा सराईत गुंड आहे. तो यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याने अटकेत होता. अलीकडेच तो तुरूंगातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दुकानदार, घाऊक व्यापारी, स्थानिक, खासगी आस्थापना चालकांना पैशांसाठी त्रास देण्यास सुरूवात केली आहे.
दिवाळीचा सण असल्याने एका व्यापाऱ्याने कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील आपले दुकान सकाळी उघडले होते. दुकान उघडल्यानंतर ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती. यावेळी सार्वजनिक रस्त्यावरून सहा जण पायी चालले होते. त्यामधील एक जण अचानक एका दुकानदाराच्या दुकानात आला. ग्राहक येण्याची वेळ आली आहे. तुम्ही दुकानात येऊ नका, असे दुकानदाराने त्या गर्दुल्ल्याला सांगितले. त्यावेळी गर्दुल्ल्याने दुकानदाराकडे ५० रूपये देण्याची मागणी केली.
अद्याप बोहनी झाली नाही. मी तुला कोठून ५० रूपये देऊ, असे प्रश्न करून दुकानदार त्या गर्दुल्ल्यासह इतर गर्दुल्ल्यांना तेथून जाण्यास सांगत होता. सहाही गर्दुल्ले तरूण गटातील होते. पैसे घेतल्या शिवाय जाणार नाही, असा पवित्रा या गर्दुल्ल्यांनी घेतला होता. आम्हाला तुमच्याकडून दिवाळी पाहिजे असा त्यांचे म्हणणे होते. सकाळीच गर्दुल्ले दुकानात आले म्हणून दुकानदार त्रासला होता. दुकानदार आपल्या दुकानाच्या कामात व्यस्त होता. दुकानाच्या दारातील गर्दुल्ला पैसे घेतल्या शिवाय हटण्यास तयार नव्हता. काही कळण्याच्या आत एक गर्दुल्ला दुकानदाराच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याने दुकानदाराला मारहाण करून त्याच्यावर धारदार चाकुने हल्ला केला. हा हल्ला सुरू असताना इतर गर्दुल्ल्यांनी दुकानात घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुरू झाला आहे.
दुकानदारावर हल्ला होताच, इतर दुकानदार धाऊन आले. त्यांनी दुकानदाराला गर्दुल्ल्यांच्या तावडीतून सोडविले. काहींनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत इतर पाच गर्दुल्ले पसार झाले होते. एकाला पकडून ठेवण्यात दुकानदाराच्या साथीदारांना यश आले होते. त्यांनी पकडलेल्या दुकानदाराला पोलिसांच्या स्वाधीन केले. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सहा गर्दुल्ल्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फरार गर्दुल्ल्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
