Kalyan Hospital Receptionist Assaults Case: कल्याणमधील नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ मंगळवारी समोर आला. नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट केल्याचे व्हिडीओत दिसत होते. या मारहाणीनंतर सदर आरोपी फरार होता. त्याला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनीही त्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. अखेर मनसे पदाधिकाऱ्यांनी रात्री आरोपीला ताब्यात घेत मनसे स्टाईलने धडा शिकवला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
मनसे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, नेवाळी नाक्यावरून जात होतो. तेव्हा आम्हाला संशयित आरोपी दिसून आला. हा तोच असावा म्हणून त्याची विचारपूस केली असता आमची धरपकड झाली. त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि मानपाडा पोलीस ठाण्यात जमा केले. यावेळी त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला असल्याचेही गव्हाणे म्हणाले.
पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, आरोपीच्या भावाला आम्ही आधीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सतर्क नागरिकांमुळे गोकुळ झा या मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीला उद्या न्यायालयात सादर केले जाईल. या गुन्ह्यामागे त्याचा हेतू काय होता? याचाही तपास केला जाईल.
पोलीस उपायुक्त दीपक झेंडे पुढे म्हणाले की, आम्ही व्हिडीओ पुरावा ताब्यात घेतला आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविण्यात येतील. हे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील. आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे झेंडे यांनी सांगितले.
अश्लील शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण
दरम्यान पीडित तरुणीने तिच्यावर घडलेला प्रसंग माध्यमांना मंगळवारी सांगितला. “माझे आई-वडील हयात नाहीत. आरोपीने मला आईवरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच माझ्या छातीवर, मानेवर लाथा-बुक्क्या घालून मारहाण केली आणि माझ्या केसाला पकडून बाहेर फरफटत नेण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती पीडितेने दिली.