कल्याण : मांडा टिटवाळ्यातील कल्याण पोलीस ठाणे (टिटवाळा) ते वासुंद्री गाव या कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारितील रस्त्याच्या माती चोरीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकाविणाऱ्या तीन जणांच्या विरुध्द टिटवाळा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यामधून निघालेल्या सरकारी मातीच्या चोरीची बातमी दिल्याबद्दल संबंधित पत्रकाराला फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणातून या तीन जणांनी धमकावले आहे. या धमकी प्रकरणाची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांंवर प्रसारित झाली आहे.
अजय शेलार (४१) असे या पत्रकाराचे नाव आहे. ते टिटवाळा वासुंद्री रस्ता भागात कुटुंबीयांसह राहतात. मांडा टिटवाळ्यातील कल्याण पोलीस ठाणे (टिटवाळा) ते वासुंद्री रस्त्याची अनेक वर्ष बांधणी झाली नाही. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. नागरिकांचे होणारे हाल, वाहन चालकांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे हा वर्दळीचा रस्ता सुस्थितीत करावा म्हणून पत्रकार शेलार सातत्याने बातम्या देत होते.
पालिकेच्या अखत्यारितील हा रस्ता असल्याने एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. हे काम सुरू करताना या रस्त्याची माती खोदकाम करून काढण्यात येत होती. ही माती सरकारी नियंत्रणाखाली असल्याने या मातीचा बाजुला ढीग किंवा तिचा साठा करून ठेवणे आवश्यक होते. पालिका, सरकारी नियंत्रणाखालील ही माती संगनमताने विक्री केली जात असल्याचे वृत्त पत्रकार शेलार यांनी दिले होते. याप्रकरणाची महसूल विभागाने दखल घेऊन त्याची चौकशी केली होती. माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी पालिकेत या माती विक्रीप्रकरणी पत्र दिले होते.
पत्रकार शेलार यांच्या बातमीमुळे दुखावलेल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य संघटक संदीप नाईक, आनंद कोल्हे, राजेश जाधव यांनी फेसबुक थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून ‘आम्ही रस्त्यासाठी निधी आणला आहे. आम्ही ही कामे करतो. तु पैसे घेऊन बातम्या छापतोस. आमच्या चांगल्या बातम्या का लिहित नाहीस. यापुढे अशी बातमी लावायची आणि लावली तर समजू जा, अशी धमकी दिली होती. या प्रकरणामुळे आपल्या जीविताला धोका असल्याची जाणीव झाल्याने पत्रकार शेलार यांनी टिटवाळा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस, महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
या फेसबुस थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून तिघांनी आपली समाजात बदनामी केली. आपल्या लिखाणावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला म्हणून पत्रकार अजय शेलार यांनी दृश्यध्वनी चित्रफितीसह या तिघांची टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ति आणि संस्था हिंसा आणि मालमत्ता नुकसान कायदा, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) अन्वये पत्रकार शेलार यांच्या तक्रारीवरून नाईक, कोल्हे आणि जाधव यांच्यावर गुन्हे दाखल केला आहे.