ठाणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या काही वर्षात विविध अभिनव प्रयोग राबविले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात उत्तम वाढ देखील झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील कोसले गावातील शेतकरी श्रीराम पालवी यांनी पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून आपली शेती फुलवली आहे. तर विशेष म्हणजे सेंद्रिय खतांची खरेदी न करता स्वतःच्या शेतीतच खतनिर्मिती सुरु केली आणि जमिनीचा पोत राखण्याबरोबरच उत्पादनात देखील वाढ केली. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे सरकारकडून त्यांना ” शेतीनिष्ठ ” पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.

वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीचा पोत बिघडत चालला असताना, अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. पर्यावरणपूरक व टिकाऊ शेतीपद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असतानाच कल्याण तालुक्यातील कोसले गावातील शेतकरी श्रीराम पालवी यांनी याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत सेंद्रिय खतांच्या आधारे एक समृद्ध शेती केली आहे. त्यांनी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक सेंद्रिय तंत्रज्ञान यांचा मेळ घालत जीवामृत, बीजामृत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा समन्वय साधला.

बीज पेरणीपूर्वी बीजामृताने बीजप्रक्रिया केली जाते, ज्यामुळे बीजांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अंकुरणाचा वेग अधिक चांगला होतो. नंतर, रोपांच्या वाढीच्या टप्प्यावर जीवामृताची फवारणी केल्याने मातीतील जैविक क्रियाशीलता वाढते, जडसूत्रे मोकळी होतात आणि झाडांना पोषण सहज मिळते. सुरुवातीला नैसर्गिक शेती करण्यासाठी घरच्या घरी जैविक निविष्ठा करण्यासाठी कृषी विभागाच्या ९ मदतीने शेतकरी पालवी यांनी जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क निंबोळी अर्क यासंबंधी कृषी विभागाचे प्रशिक्षण घेतले आणि वेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्र मध्ये कृषी विभागाच्या मदतीने प्रशिक्षण पूर्ण केले.

श्रीराम पालवी यांच्या प्रयोगातील विशेष बाब म्हणजे त्यांनी सेंद्रिय खतांची खरेदी न करता, शेतात उपलब्ध साधनांपासूनच सर्व खत तयार केली. त्यासाठी त्यांनी ताज गोमय, गोमूत्र, शेतीतील सेंद्रिय कचरा, झाडांचा पालापाचोळा, गांडूळ आदी वापरले. बिजामृत बनवण्यासाठी गोमूत्र, गोमय, थोडीशी शेतीतील माती आणि पाणी घेऊन बीज प्रक्रिया केली जाते. जीवामृत बनवण्यासाठी गोमूत्र, गोमय, गूळ, हरभऱ्याचं पीठ आणि पाणी यांचं मिश्रण वापरले जाते. हे खत पिकांवर फवारणीद्वारे वापरले जाते. यांच्या मदतीने त्यांनी दोन्ही हंगामात उत्तम पीक घेतले.

शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीचा पोत बिघडवतात, मातीतील सजीव नष्ट करतात आणि दीर्घकालीन उत्पादनावर विपरीत परिणाम करतात. याउलट सेंद्रिय खतांचा वापर केल्यास मातीतील सजीवांचे संवर्धन होते, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते, पीक उत्पादन नैसर्गिकपणे वाढते, अन्न विषमुक्त व पोषक राहते, पर्यावरण प्रदूषित होत नाही, दीर्घकालीन शेती टिकवली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करावा असे मत शेतकरी श्रीराम पालवी यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना व्यक्त केले.