कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक हैराण आहेत. गेल्या आठवड्यात कल्याण शहरातील मोहने, गौरीपाडा, आडिवली-ढोकळी भागातील तीन जणांना भटक्या श्वानाने चावे घेतल्याचे पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील दप्तरी नोंंद आहे. पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रातील भटक्या श्वान प्रतिबंधक पथकाने शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काही दिवसापूर्वी टिटवाळा येथे एका वृध्द भिक्षेकरी महिलेवर मध्यरात्रीच्या सुमारास चार भटक्या श्वानांंनी हल्ला केला. एकावेळी चार श्वान अंगावर आल्याने आणि त्यांनी शरीराचे लचके तोडण्यास सुरूवात केल्याने महिला जमिनीवर कोसळली. या प्रतिकार करूनही श्वानांच्या तावडीतून महिलेची सुटका झाली नाही. महिलेला श्वानांनी १५ फूट अंतरावर फरफटत नेले. गेल्या आठवड्यात कल्याण पश्चिमेतील मोहने, गौरीपाडा आणि कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात भटक्या श्वानांंनी हल्ला करून तीन जणांंना चावे घेतले. यामध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा…डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

भटक्या श्वानांचे वाढते हल्ले, समाज माध्यमांवर भटके श्वान एकावेळी पादचारी, मुलांवर हल्ले करत असलेले अनेक दृश्यचित्रफिती समाज माध्यमांंवर सामायिक होत आहेत. पालकांमध्ये अस्वस्थता आहे. मध्यरात्री उशिरा घरी परतणाऱ्या नोकरदारांना भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागतो. रिक्षा चालक, दुचाकी स्वार यांचाही पाठलाग भटके श्वान झुंडीने करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकांवरही भटक्या श्वानांचा प्रवाशांना उपद्रव आहे.

नागरिकांच्या तक्रारी

कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात उघड्यावर मासळी बाजार भरविले जातात. गल्लीबोळात मटण विक्रीची दुकाने सुरू आहेत. या दुकानांतील टाकाऊ मांस, पादचारी नागरिकांच्या मासळी, मटणाच्या पिशव्यांवर झडप घालून भटके श्वान ताव मारतात. या मांस विक्रीच्या ठिकाणी भटक्या श्वानांच्या सर्वाधिक झुंडी आढळून येतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

भटक्या श्वानांचे नागरिकांवर होणारे वाढते हल्ले विचारात घेऊन नागरिकांनी आता केंद्र, राज्य सरकारकडे याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींवक दबाव वाढविण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांंनी अशा श्वानांची विहित वेळेत नसबंदी केली पाहिजे. या प्रक्रिया अलीकडे होतच नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना श्वानांच्या हल्ल्यातून होत आहे. डाॅ. आनंद हर्डीकर डोंबिवली.

हेही वाचा…चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका हद्दीतील भटक्या श्वानांचा नागरिकांना त्रास होणार नाही याविषयी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी, त्यांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात आणण्याचे नियोजन केले जात आहे. डाॅ. दीपा शुक्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी. कडोंमपा.