कल्याण : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या रविवारच्या वाढदिवसानिमित्त (२७ जुलै) कल्याण मधील शिवसेनेचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी कलाकृती असलेले स्मृतिचिन्ह तयार करून घेतले आहे. या कलाकृतीच्या स्मृतिचिन्हावर बंड्या साळवी यांनी काव्यमय शैलीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गद्दारांच्या राजकारणावर, त्यात अडकलेल्या लोकशाहीवर काव्यमय शैलीत टीका केली आहे. त्यात आताच्या राजकारणात उध्दव ठाकरे यांची गरज अधोरेखित केली आहे.

या स्मृतिचिन्हाची कलाकृती समाज माध्यमावर प्रसारित झाल्यापासून हा स्मृतिचिन्हावरील काव्यमय शैलीतील विषय शिवसैनिक, नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेत दुभंग झाल्यापासून उपनेते बंड्या साळवी छत्रतपी शिवाजी महाराज जयंती, गणेशोत्सव काळात गद्दारांचे राजकारण, त्यामुळे लोकशाही, राजकारणाचे होत असलेले अवमूल्यन या विषयावर देखावे, चित्ररथ काढून समाजात जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी पोलिसांनी त्यांच्या या देखाव्यांना हरकत घेऊन त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखावे समाजासाठी खुले असावेत. त्यात टीकात्मक काही नाही या न्यायासाठी उपनेते बंड्या साळवी यांना काही वेळा उच्च न्यायालयातही धाव घ्यावी लागली आहे. शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांनी आपली निष्ठा शिवसेना दुभंगली तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या चरणी ठेवली आहे. साळवी यांनी शिंदे शिवसेनेत दाखल व्हावे म्हणून दोन वर्षापूर्वी साळवी यांना शिंदे शिवसेनेकडून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यांना तडिपार करण्याचे प्रयत्न झाले. कायदेशीर मार्गाने साळवी यांनी हे दबावाचे राजकारण वेळोवेळी झुगारून लावले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना दुभंगली. तेव्हापासून उपनेते बंड्या साळवी हे गद्दार विषय घेऊन विविध प्रकारचे देखावे, कलाकृती तयार करून समाजाला त्याचे प्रदर्शन घडवत आहेत. दोन वर्षापूर्वी त्यांनी रामबागमध्ये गणेशोत्सव काळात उभारलेला गद्दार विषयावरील ऐतिहासिक देखावा वाद्ग्रग्रस्त ठरवून पोलिसांनी त्यास हरकत घेतली होती.

रविवारी उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. पक्षप्रमुखांना शुभेच्छा देताना उपनेते बंड्या साळवी यांनी काव्यमय शैलीचा वापर करून एक काव्य समृतिचिन्हावर कलाकृतीच्या माध्यमातून मांडले आहे.या स्मृतिचिन्हावरील काव्यमय मांडणीत उपनेते बंड्या साळवी म्हणतात,“आज सारेच उफराटे झाले आहे. गद्दारांच्या राजकारणाने महाराष्ट्र खिळखिळा झाला आहे. हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीकडे सामान्य जनता आत्मविश्वास गमावलेल्या नजरेने हताशपणे पाहत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्याय, अन्यायाचा हिशेबच कळत नाही. गद्दारांच्या विळख्यात लोकशाही अडकली आहे. महाराष्ट्र अंधारात चाचपडत आहे. अशा या निबिड अंधकारमय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या तेजस्वितेची गरज आहे. उध्दव ठाकरे यांची तेजस्विता भगव्या तेजाने या देशावर झळाळू दे, ” अशी मागणी उपनेते बंड्या साळवी यांनी श्री दत्तप्रभू चरण केली आहे. स्मृतिचिन्हाची कलाकृती कलाकृतीकार राजेश पवार यांनी तयार केली आहे.