कल्याण – कल्याणमधील रहिवासी आणि खडकपाडा पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या साहित्यिक, कवी असलेल्या अर्जुन डोमाडे यांच्या ‘भितुर’ या कथासंग्रहाला सातारा येथील कुंडल कृष्णाई हा राज्यस्तरिय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला. सातारा येथील एका कार्यक्रमात साहित्यिक अर्जुन डोमाडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक शरद तांदळे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
पोलीस दलातील आव्हानात्मक नोकरी सांभाळून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे विविध विषयावर लेखन करतात. आपले साहित्यप्रेम त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून जपून ठेवले आहे. या पुस्तकातील आशय विचारातून कुंडल कृष्णाई या साहित्य चळवळीतील संस्थेने पोलीस अधिकारी डोमाडे यांच्या कथासंग्रहाची कुंडल कृष्णाई उत्कृष्ट वाडमय पुरस्कारासाठी निवड केली.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत जगदाळे, सचिव सावित्री जगदाळे उपस्थित होते. डोमाडे यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. आपले मार्गदर्शक गुरू दिवंगत अरूण मैड यांच्यामुळे पोलीस दलातील नोकरी सांभाळून हा आपण साहित्यिक प्रवास केला आहे. हा पुरस्कार आपण अरूण मैड आणि आपल्या अशा अनेक मार्गदर्शकांमुळे मिळू शकलो, असे पोलीस अधिकारी डोमाडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
अर्जुन डोमाडे यांच बालपण कल्याण पश्चिमेतील घोडेखोत आळीत गेले. गांधी चौकातील जिल्हा परिषद शाळा, अभिनव हायस्कूल, रामबागेतील सिध्दार्थ रात्र महाविद्यालय, बिर्ला महाविद्यालय येथे त्यांनी आपले शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पोलीस दलात डोमाडे मागील ३४ वर्षापासून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासून आपणास वाचनाची आवड होती. या गोडीतून आपण साहित्य वाचनाकडे वळलो. चांगले साहित्यिक, कवी मार्गदर्शक आपणास मिळाले, असे डोमाडे सांगतात.
विविध दैनिक, मासिकांमध्ये त्यांचे साहित्यिक लेख, कथा, कविता प्रसिध्द झाले आहेत. शालेय जीवनात अभिनव शाळेत असताना वर्ग शिक्षक अरूण मैड यांच्या मार्गदर्शनामुळे आपणास साहित्यिक आवड निर्माण झाली. तेथून आपली लिखाणाला सुरूवात झाली, असे डोमाडे सांगतात. त्यांच्या ‘पेरणी’ या कवितेला कल्याण मधील याज्ञवल्क्य संस्थेचा उर्दूचे अभ्यासक दिवंगत पद्माकर जोशी प्रथम पुरस्कार मिळाला आहे. लोककवी डाॅक्टर वामनदाद कर्डक यांच्या चरित्रात्मक कांदबरीचे लिखाण आपण करत आहोत. याशिवाय एक काव्य संग्रहाचे हस्तलिखित तयार आहे. हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे, असे डोमाडे यांनी सांगितले.
पोलीस दलातील नोकरी सांभाळून आपण साहित्यप्रेम जपत आहोत. लिखाणातून एक वेगळा आनंद मिळतो. लोककवी डाॅ. वामनदाद कर्डक यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी लिखाणाचे आव्हानात्मक काम आपण हाती घेतले आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचे चरित्र आपण लिहितोय याचा एक वेगळा आनंद आहे. अर्जुन डोमाडे– साहय्यक पोलीस उपनिरीक्षक, खडकपाडा पोलीस ठाणे.