कल्याण – काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या या नदीचे पाणी टिटवाळा शहर परिसरातील सखल भागात शिरले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या, चाळींचा भाग, रस्ते जलमय झाले आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या सखल भागात पाणी साचले आहे.
रिजन्सी सर्वम संकुल, नदी काठचे उद्यानात पुराचे पाणी शिरले आहे. टिटवाळा गणपती मंदिरा जवळील पटेल मार्ट परिसरातील भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. रायते पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने कल्याणकडून मुरबाड, जुन्नर भागात जाणारी वाहने टिटवाळा गोवेली मार्गे इच्छित स्थळी जात आहेत. त्यामुळे टिटवाळ्यातून धावणाऱ्या वाहनांना रस्ते मार्गावरील पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. कल्याण मोहने टिटवाळा रस्त्यावर पाणी आले आहे.
शहरांतर्गत पाणी तुंबलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आणि त्यांचे आपत्कालीन पथक मंगळवारपासून कार्यरत आहे. बुधवारी सकाळी साहाय्यक आयुक्त पाटील यांच्यासह आपत्कालीन पथकाने शहराच्या पाणी तुंबलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या आहेत. आवश्यक तेथे उपसा पंप बसविण्यात येत आहेत. टिटवाळा काळू नदी काठचा भाग आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढते त्याप्रमाणे पाणी शहरात शिरकाव करत आहे.
टिटवाळा शहराला पाणी पुरवठा करणारे साडे सात दशलक्ष लीटरचे पाणी पुरवठा केंद्र पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या केंद्राचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रायते येथील नदी काठच्या एका शेतघरातील नऊ गायी आणि सात वासरे रूपेश देसले आणि इतर मजुरांनी पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढली.
खडवली येथे भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी आसपासच्या वस्तीत शिरले आहे. या भागातील नदी काठची हाॅटेल, ढाबे, पानटपऱ्या पुराच्या वेढ्यात अडकल्या आहेत. पुराचे पाणी वाढत असल्याने बेहरे ग्रामपंचायतीने एक खास वाहनातून नदी काठच्या रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी ध्वनीक्षेपकावरून आवाहन करण्यात येत आहे. भातसा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वाहन चालकांनी जलमय झालेल्या रस्त्यावरून वाहने चालवू नयेत यासाठी या भागात टिटवाळा, रायते भागात काही जागरूक नागरिक वाहन चालकांना सूचना करत आहेत. अनेक उत्साही वाहन चालक जलमय झालेल्या रस्ते, पुलावरून धाडस करून वाहन नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण या पुलांच्या भागात उभे असलेले काही जागरूक नागरिक वाहन चालकांना रोखण्याचे काम करत आहेत.