कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दररोज सकाळ, संंध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी विशेषता नोकरदार वर्गामध्ये अस्वस्थता आहे. रस्ते मार्गाने कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला तर शिळफाटा, भिवंडी-ठाणे रस्त्यावर नियमित वाहतूक कोंडी असते. त्यामुळे कल्याण परिसरातील प्रवासी रेल्वेने कार्यालय गाठण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात येतात. त्यांना रेल्वे स्थानक भागात रस्ते कोंडीला दररोज तोंड द्यावे लागते.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीची कामे सुरू आहेत. या पुलाच्या आधार खांबांमुळे रस्ते मार्ग अरूंद झाले आहेत. या अरूंद मार्गिकेतून वाट काढत जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. सकाळच्या वेळेत कामावर जाताना मुरबाड रस्ता, गुरूदेव हाॅटेल, शिवाजी चौक मार्गे आल्यानंतरही रेल्वे स्थानक भागात वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. संध्याकाळी कामावरून परतल्यावरही तोच प्रकार असतो. कल्याण शहरातील हे वाहतूक कोंडीचे विघ्न संपणार कधी, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहन कोंडी कमी करण्यासाठी पालिका आणि वाहतूक विभागाने कल्याण ते उल्हासनगर दरम्यानच्या उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडीला प्रतिबंध आणला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी अवजड वाहने शहाड, बिर्ला महाविद्यालय रस्ता, खडकपाडा भागातून धावत आहेत. मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता भागातील अवजड वाहनांचे प्रमाण कमी झाले आहे. दुर्गाडी पुलाकडून येणारी वाहने संतोषी माता रस्त्यावरून रामबाग गल्ली मार्गे म्हस्कर रुग्णालय येथून बाईचा पुतळा येथून कल्याण पूर्वेत जाण्याचा प्रयत्न करतात.
ही वाहने मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्त्यावर कोंडी करतात. पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यान मेट्रो मार्ग उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांमुळे दोन मार्गिकांमधील वाहने एकाच मार्गिकेतून धावत आहेत. रेल्वे स्थानक, बाजारपेठेतील रस्त्यांवर दुतर्फा दुकानदारांची दुचाकी वाहने, मोटारीतून आलेले ग्राहक यांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे कोंडीत भर पडते.
मागील काही महिन्यांपासून कल्याण शहर शिवाजी चौक, मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक, लालचौकी भागात दररोज सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीने जाम होत आहे. या सततच्या कोंडीमुळे कल्याण शहरातील नागरिक, नोकरदार वर्ग तीव्र नापसंती व्यक्त करत आहे. वाहतूक विभागाचे पोलीस, सेवक रस्तोरस्ती तैनात असतात. पण, अरूंद रस्ते, रस्त्यांच्या वाहन साठवण मर्यादेपेक्षा अधिकची वाहने रस्त्यांवरून धावत असल्याने वाहतूक विभागाची कोंडी सोडविताना तारांबळ उडत आहे. कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागातून विद्यार्थी वाहू बस शहरातून धावतात. या कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.