ठाणे: ठाणे जिल्ह्यात फक्त वडपे ते खारेगाव याच भागात वाहतूक कोंडी होते आहे का. जिल्ह्यातल्या जवळपास सर्व शहरांमध्ये कोंडी होते आहे. उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्या मतदारसंघात सुद्धा कोंडी होते आहे. पलावा पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खड्डे पडल्याने बंद केला. मग या प्रश्नावर बोलायचे सोडून सगळेच वडपे ते खारेगाव याच मार्गावर का बोलत आहेत, असा जोरदार घणाघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी वडपे खारेगाव रस्त्यावरून कपिल पाटील यांना लक्ष्य केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले. तर यावर खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार किसन कथोरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या सर्वांवर कपिल पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
ज्या बुद्धिमान खासदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्याच्या कामाचा विषय काढला, त्यांच्याच मतदारसंघात शहापूर ते मुरबाड या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाडा रस्ता त्यांच्याच मतदारसंघात आहे. चिंचोटी कामण रस्त्याबद्दल का बोलत नाही. जर वडपे ते खारेगाव या पट्ट्यातील कंत्राट दारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार असेल तर मुरबाड शहापूर रस्त्याच्या घोडबंदर रस्त्याच्या आणि इतर सर्व रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत त्या त्या कंत्राटदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे सांगत कपिल पाटील यांनी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यावर टीका केली. मुरबाड शहापूर रस्त्यावरून त्यांनी म्हात्रे यांच्यासह आमदार किसन कथोरे यांच्यावरही टीका केली.
भिवंडी महामार्गावर टाटा आमंत्रा ते वडपे आणि खारेगाव ते माजीवडा या भागातही कोंडी होत असते .मात्र त्या कोंडीबद्दल कोणीही बोलत नाही. परिवहन मंत्री यांच्या मतदारसंघात असलेल्या गायमुख घोडबंदर रस्त्यावर सर्वाधिक कोंडी होते आहे. त्यावर कोणी बोलत नाही, असेही कपिल पाटील यावेळी म्हणाले.
आधी दिव्याखालचा अंधार बघा
कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक वादग्रस्ताच्या पलावा पुलाबद्दलही कपिल पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्यांच्या मतदारसंघात मोठी समस्या आहे ते दुसऱ्यांच्या मतदारसंघातील समस्येवर बोलत आहेत, असा खरमरीत टोला कपिल पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला. श्रीकांत शिंदे यांनी वडपे ते खारेगाव या रस्त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पलावा पूल उद्घाटनाच्या दोन दिवसातच खड्डे पडल्याने बंद करावा लागला होता अशी ही आठवण कपिल पाटील यांनी करून दिली. या रस्त्याबाबत जर कुणाला निलंबित केले जात असेल तर हरकत नाही. पण इतर रस्त्यांबाबत कुणालाही निलंबित केल्याचे ऐकिवात नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्याला संधी मिळते तो वडपे खारेगाव रस्त्यावर वक्तव्य करतो. बोलणाऱ्यांनी आधी आपल्या दिव्या खालचा अंधार पहावा मग वक्तव्य करावे असाही टोला पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला.
ठरवून लक्ष्य करण्याचा प्रयत्न
एखाद्या व्यक्तीला लक्ष करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे याचा अर्थ ज्याला लक्ष्य केले जाते आहे तो किती शक्तिशाली आहे असे समजा. सर्व एकत्र येऊनही आम्हाला नमवता येत नाहीये. म्हणजे आम्ही किती शक्तिशाली आहोत हे समजून घ्या. सरकार म्हणून तुमचे नियोजन चुकले आहे, असाही आरोप कपिल पाटील यांनी केला. समृद्धी महामार्ग जिथे संपतो तेथून ठाण्यापर्यंत उन्नत मार्ग तयार करावा अशी माझी मागणी होती. ती पूर्ण केली असती तर आजची समस्या उद्भवलीच नसती, असेही कपिल पाटील म्हणाले.