कल्याण शहरात प्रवेश करतानाच आधारवाडी कचराभूमीची दुर्गंधी, डोंबिवलीत प्रवेश करताना मुख्य प्रवेशव्दारावरील कचऱ्याचे ढीग पाहून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात डोंबिवली हे घाणेरडे शहर म्हणून उल्लेख केला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी डोंबिवली प्रवेश करताना दिसलेले कचऱ्याचे ढीग पाहून प्रथम शहराच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग हटवा, शहर सुंदर ठेवा अशी टिपणी डोंबिवलीतील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे दुर्गंधीयुक्त, घाणेरडी शहरे असा शिक्का कल्याण डोंबिवली पालिकेच्या कपाळी बसला होता.
गेल्या दोन वर्षाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, घनकचरा विभागाचे माजी उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेवरील कलंक पुसून स्वच्छतेसंदर्भात देशातील पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीत कल्याण डोंबिवली पालिकेला आणण्याचा निर्धार केला. दोन वर्षाच्या कालावधीत कचरा निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, मलनिस्सारण, हवा, जल प्रदूषण अशा पंचतत्वावर प्रभावी काम करून कल्याण डोंबिवली पालिकेला राज्य शासनाचा ‘माझी वसुंधरा’ पुरस्कार मिळून देण्यात महत्वाची कामगिरी केली आहे. पर्यावरण संवर्धनात पालिकेने केलेल्या कामगिरीसंदर्भात हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी वसुंधरा संवर्धनात कडोंमपाचा क्रमांक २२ वा होता. यावेळी तो १६ व्या क्रमांकावर येऊन व्दितीय क्रमांकाची पालिका मानकरी ठरली आहे.
कचरा ही कडोंमपातील मुख्य समस्या होती. उपायुक्त डॉ. कोकरे यांच्या दोन वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे पालिका हद्दीत कचऱ्याचे ओला, सुका वर्गीकरण सुरू झाले. कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रयोग यशस्वी झाले. १५ हजार टन खत आता पालिका तयार करत आहे. आधारवाडी कचराभूमी बंद करण्यात प्रशासनाला यश आले. शहरातून कचराकुंड्या हटवून दारात येणाऱ्या घंटागाडीत कचरा संकलनाची मोहीम यशस्वी झाली आहे. शहरातील २५ हून अधिक ठिकाणचे नाले, गटारे थेट उल्हास खाडीत जाऊन मिळत होते. त्यामुळे जलप्रदूषण होत होते. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी या सर्व स्त्रोतांच्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारून मग ते पाणी खाडीत जाईल असा निर्णय घेतला आहे.
आंबिवलीजवळ बल्याणी गाव हद्दीत ४० एकर जमिनीवर ६५ हजाराहून अधिक झाडे लावून, त्यांचे संगोपन करून निसर्ग उद्यान पालिकेने फुलविले आहे. विविध प्रकल्पांसाठी दोन वर्षात विकासकांनी एक हजार ३२ झाडे तोडली. त्या बदल्यात विकासकांकडून विविध भागात १९ हजार झाडे लावून घेण्यात आली. टिटवाळा-काटई वळण रस्ते मार्गात एक हजार झाडे बाधित झाली. या झाडांच्या बदल्यात बल्याणी जवळ वन विभाग, एमएमआरडीएच्या माध्यमातून १५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. या कामासाठी प्राधिकरणाने दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. वड, चिंच, पिंपळ, शिसम, नागकेसर, उंबर, फणस, कडुनिंब अशी झाडे उद्यानात फुलली आहेत.
पालिका हद्दीत जलसंचय पुनर्भरण, वाहनांव्दारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, २१७ विद्युत बस खरेदी करणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. पालिका हद्दीतील राखीव भूखंड सामाजिक संस्थांना वृक्षारोपण, उपक्रमांसाठी दिली आहेत. १०० क्रीडामैदाने पालिका विकसित करत आहे. या उपक्रमांमुळे पालिकेचा चेहरामोहरा बदलत आहे. घाणेरडी म्हणून ओळखली जाणारी पालिका आता सुंदरता आणि स्वच्छतेकडे वाटचाल करत आहे.
“नागरीकरणाबरोबर शहरातील नैसर्गिकता टिकवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. लोकसहभाग, संस्था यांचे या कामासाठी सहकार्य मिळत आहे. कल्याण डोंबिवली शहरे स्वच्छ सुंदर त्याच बरोबर प्रदुषण मुक्त राहतील यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांमधील यश म्हणजे माझी वसुंधरा पुरस्कार,” असं डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले आहेत.