टीडीआर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्यातील अधिकारी मोकाट
कल्याण डोंबिवली महापालिकेतील मौजे चिकणघर येथील ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) घोटाळा आणि झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा सध्या शासन आणि शहर पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये सर्व पक्षीय राजकीय मंडळींचा सहभाग आहे. या दोन्ही प्रकरणात शासनाने चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाईचे सुतोवाच केले आहे. असे असताना याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले अधिकारी अद्याप मोकाट असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
झोपु घोटाळ्यात दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही या दोन्ही व्यवस्थेच्या नियंत्रक असलेल्या तपास यंत्रणा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे. राजकीय दबाव टाकून हे दोन्ही घोटाळे दाबण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील काही राजकीय मंडळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर यानिमित्ताने करण्यात येत आहे, असेही बोलले जात आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यात शहरी गरिबांची हक्काची घरे घूसखोरांनी लाटली आहेत. या योजनेत अधिकारी, समंत्रक, ठेकेदार यांनी घोटाळा करून गरिबांना रस्त्यावर आणण्याचे उद्योग केले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणातील दोषींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर कठोर कारवाई होणे आवश्यक होते. झोपु घोटाळ्यातील दोषी आरोपींचे जामीन न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. तरीही लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दोषींना चौकशीसाठी ताब्यात घेत नसल्याने या प्रकरणातील याचिकाकर्त्यांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झोपु घोटाळ्याचा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला आहे. असे असताना तपास अधिकारी कोणत्या कागदपत्रांचा शोध घेत आहेत, असा प्रश्न याचिकाकर्त्यांने केला आहे. बदलापूर नगरपालिकेत ‘टीडीआर’ घोटाळा झाल्यानंतर त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव महापालिकेत घरकुल घोटाळा झाल्यानंतर चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा करण्यात आली. अशी परिस्थिती अन्यत्र असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील टीडीआर, झोपु घोटाळा प्रकरणी कोणाही दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळी ही प्रकरणे पुढे येऊ देत नसल्याची चर्चा आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी सुरुवातीच्या सहा महिन्यात तडाखेबाज काम करून राजकीय मंडळींना गप्प केले होते. दोन महिन्यांपासून आयुक्तही थंडावल्याची चर्चा सुरू आहे.

हॉटेलसाठी भिवंडीतून दबाव
डोंबिवलीतील पाथर्ली येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला अडथळा ठरणारे हॉटेल तोडण्याची कारवाई गेल्या आठवडय़ात पालिकेने केली. हे हॉटेल मनसे, भाजपशी संबंधित एका कार्यकर्त्यांचे होते. या हॉटेलवर कारवाई होऊ नये म्हणून स्थानिक राजकीय मंडळी जीवाचा आकांत करीत होती. यामध्ये काही दलालांचा सहभाग होता. ही कारवाई सुरू असताना आयुक्त ई. रवींद्रन नवी दिल्ली येथे गेले होते. आयुक्तपदाचा पदभार असलेला अधिकारी कोणलाही दाद देत नसल्याने अखेर भिवंडीतील एका वजनदार राजकीय नेत्याने रात्रीच्या वेळेत एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याला संपर्क करून, ‘आमच्या मंडळींना उगाच त्रास देऊ नका’, असा सल्ला दिल्याची चर्चा आहे. हाच लोकप्रतिनिधी ठाण्यात जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना हटविण्यासाठी सक्रिय होता. राज्यातील सत्तेचा आधार घेऊन कल्याण डोंबिवलीतील सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी शहर विकासापेक्षा नियमबाह्य़ कामांना सर्वाधिक प्रोत्साहन देत असल्याची चर्चा आहे.