ठाणेः दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी आणखी एक गोड भेट आली आहे. कोकणचा सुप्रसिद्ध हापूस आंबा वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. सणासुदीच्या काळात आंब्याच्या मोहक सुगंधाने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पसरले असून, ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसात दाखल झालेल्या या आंब्याच्या पेटीला विक्रमी भाव मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

हापूस आंब्याचा मुख्य हंगाम हा मार्च ते जून दरम्यान असतो. परंतू, हवामानातील बदलामुळे तसेच योग्य पद्धतीने आंब्याच्या मोहोरची निगा राखली तर, काही वेळा तो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येही मर्यादित प्रमाणात दिसून येतो. देवगड येथील पडवणे गावातील शिरर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते.

योग्य काळजी आणि फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली ६ डझन हापूस आंब्याची पेटी त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतूर्दशी ला २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली आहे. त्यामुळे यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिरर्सेकर यांना मिळाला आहे.

वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलालवर्गाकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र, यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून विक्रमी प्रारंभ केला आहे. कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिल्याच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या आंबापेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे.

येत्या सात दिवसात आंबा पूर्णपणे तयार होईल…

आंब्याच्या मोहोरलाला ऊन आणि पाऊस दोन्ही पाहिजे असते. परंतू, पाऊस हा कमीप्रमाणात लागतो. त्यामुळे अती मुसळधार पावसात आंब्याच्या मोहोरचे संरक्षण करणे त्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. यंदा इतक्या मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असतानाही, जूलै महिन्यात आलेल्या आंब्याच्या मोहोरची प्रकाश शिर्सेकर आणि त्यांच्या दोन मुलांनी योग्यती काळजी घेतली. त्यामुळेच इतक्या चांगल्या पद्धतीने आंबा तयार झाला. सहा डझन आंब्याची पहिली पेटी शिर्सेकर यांनी मुंबईत दाखल केली आहे. हे आंबे पूर्णपणे तयार व्हायला आणखी सात ते आठ दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर, विक्रमी दराने या आंब्याच्या पेटीची विक्री होईल, अशी माहिती हर्षल जेजुरकर या व्यापाऱ्यांनी सांगितले.