ro-ro ferry mumbai to goa: ठाणे : मुंबई, ठाण्याहून कोकणात गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणवासीय त्यांच्या खासगी वाहनाने किंवा रेल्वेने गाव गाठतात. रेल्वेत आरक्षण फुल्ल असणे, रस्त्यावर खड्डे यामुळे कोकणातील प्रवास दरवर्षी त्रासदायकच असतो. यावर्षी कोकण रेल्वेने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) रेल्वे स्थानकापर्यंत विशेष रो-रो कार सेवा सुरु केली आहे. या सेवेला नांदगाव स्थानकात थांबा दिल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळणार असून आपले वाहन गावात नेणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. या सेवेची माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली आहे, सेवा काय आहे जाणून घेऊया.

मुंबई, ठाणे शहरात कोकणातील नागरिक मोठ्याप्रमात राहतात. परंतु अपुऱ्या रेल्वे सेवा, रस्त्यावर पडलेले खड्डे यातून मार्ग काढताना हा प्रवास त्रासदायक ठरतो. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणातील नागरिकांना काहीसा दिलासा देणारी रो-रो कार सेवा सुरु होणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांची मागणी होती, त्यांना त्यांच्या गावात, शहरात कार घेऊन जाता याव्यात. त्यामुळे विशेष कार रो-रो सेवा आम्ही चालविणार आहोत. ही विशेष कार रो-रो सेवा कोलाड ते वेर्णा पर्यंत जाणार आहे. ही रो-रो नांदगाव स्थानकात थांबणार असून या स्थानकापासून कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळला जाणाऱ्यांंना त्याचा फायदा होणार आहे. सेवा २३ ऑगस्टला कोलाडपासून सुरु करणार असून ती कोलाडला दुपारी ३ वाजता सुरु होईल. ती नांदगावला रात्री १० वाजता पोहचेल.

सुविधा कोणत्या असतील?

रो-रो नांदगाव स्थानकात पोहचल्यानंतर कार उतरविण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्युत रोषणाई, रॅम्प असेल. यानंतर तीच रो-रो पुढे वेर्णा, गोवा येथे जाणार आहे. सकाळी ६ वाजता ही गाडी तेथे पोहचेल. ही सेवा प्रत्येक अल्टरनेट दिवसाला कोलाड आणि वेर्णा स्थानकातून असेल. यामध्ये थर्ड एसी कोच, सेकंड क्लास कोच देखील जोडले असणार आहे. प्रवासी अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करु शकतात. कोचमध्ये कॅटरिंगची व्यवस्था आहे.

गणेशोत्सवासाठी ही एतिहासिक सेवा आहे. या सेवेचा प्रवासी नक्की लाभ घेतील असे अधिकाऱ्याने सांगितले. रो-रो विशेष गाड्यांची सेवाची माहिती दिल्यानंतर दोन नोंदणी आल्या होत्या. या रो रो सेवेच्या नोंदणीची तारिख १८ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली. शेवटच्या आठवड्यात नोंदणी वाढण्याची शक्यता आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष रेल्वे गाड्यांचे सेवेतही वाढ

मागील वर्षी ३०२ गणपती विशेष रेल्वेगाड्या कोकणात सुरु होत्या. या वर्षी त्यामध्ये वाढ करुन ३५० च्या आसपास विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या जाणार आहेत असेही अधिकाऱ्याने सांगितले.