डोंंबिवली : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहत असलेल्या एका विकासकाने डोंबिवली जवळील कोळे गाव हद्दीत काटई बदलापूर रस्त्यावर एका इमारतीमधील सदनिका पुणे येथील एका घर खरेदीदाराला पाच लाख ९० हजार रूपयांना विक्री केली होती. त्यानंतर विकासकाने घराचा ताबा घर खरेदीदाराला न देता ती सदनिका परस्पर अन्य एका ग्राहकाला विक्री करून मूळ घर खरेदीदाराची आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात राहत असलेल्या एका नागरिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नवी मुंबईतील विकासकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा विकासक मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर परिसरातील रहिवासी आहे. एप्रिल २०१५ ते जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण नवी मुंबईतील विकासकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील कोळे गाव हद्दीतील एक इमारतीमधील सुस्थितीत केलेली सदनिका आपणास पाच लाख ९० हजार रूपयांना विक्री केली होती. यासंदर्भात नोंदणीकृत विक्री करारनामा होऊन आपण सदनिका खरेदीचे शुल्क रूपये पाच लाख ९० हजार रूपये विकासकाला हस्तांतरित केले होते. विकासकाने आपणास लवकरच सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आपण सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी विकासकाकडे तगादा लावला होता. पण ते वेळकाढूपणाची कारणे देत होते.
दरम्यानच्या काळात विकासकाने आपली परवानगी न घेता आपण खरेदी केलेली सदनिका विकासकाने परस्पर अन्य एका नागरिकाला कुलमुखत्यार पत्राव्दारे विक्री केली. त्या सदनिकेचा ताबा त्या नागरिकाला दिला आहे. त्यामुळे विकासकाने आपणास सदनिका न देता आणि आपले सदनिकेसाठी घेतलेले पैसे परत न करता, आपली आर्थिक फसवणूक केली म्हणून पुणे येथील नागरिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर याप्रकरणाचा तपास करत आहेत.