बदलापूरः बदलापूर शहरात सिग्नल यंत्रण बसवण्याच्या नावाखाली शहरातील जुनी आणि डेरेदार वृक्ष हटवण्याचा सपाटाच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने लावला आहे. कुळगाव बदलापूर पालिकेने शहरातील महत्वाच्या ठिकाणच्या १६ वृक्षांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यात बदलापूर पश्चिमेतील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध दत्त चौकातील वडाच्या झाडाचाही समावेश आहे. ही या परिसराची ओळख असून ती काढण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.

गेल्या आठ वर्षात पालिकेने दोनदा हे वृक्ष हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.झपाट्याने वाढणारे नागरिकरण आणि त्यामुळे होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे शहरातील झाडे कमी होत आहेत. इमारतींचा पुनर्विकास, राहत्या बंगल्यांच्या पुनर्विकासात सर्वाधिक झाडे तोडली जात आहेत. बदलापूरसारख्या शहरात इमारतींची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे झाडांसह हिरव्यागार जागा, दलदलीच्या जागा जवळपास संपल्या आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षात बदलापुरसारख्या शहराचे तापमान ४४ अंश सेल्सियवर पोहोचल्याचे दिसून आले. त्यातच शहर विकासात झाडांना हटवण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातील विविध भागातील १६ वृक्षांना हटवले जाणार आहे. यात म्हात्रे चौकातील ३, समर्थ चौकातील ३, गणेश चौकातील ३, श्री कॉम्पलेक्स येथील १ आणि दत्त चौकातील एका झाडाचा समावेश आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने याबाबतची सूचना जाहीर केली असून सात दिवसाच्या आता सूचना आणि हरकत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मात्र या यादीत पुन्हा एकदा बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकातील वडाच्या झाडाचा समावेश करण्यात आल्याने संताप व्यक्त होतो आहे.

बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकात असलेले वडाचे झाड हे त्या परिसराची सर्वात जुनी ओळख आहे. हे झाड सुमारे १५० वर्ष जुने असण्याची शक्यता आहे. आजही पत्ता सांगताना या वडाचा उल्लेख केल्याशिवाय पत्ता पूर्ण होत नाही. आधीच दत्त चौकातील तीन महत्वाचे वृक्ष हटवण्यात आले होते. त्यामुळे दत्त चौकाचा सदाहरित परिसर आधीपेक्षा बोडका झाला आहे. त्यात आता येथील वडाचे मोठे डेरेदार वृक्ष हटवण्याचा निर्णय घेतल्याने हा परिसर आणखी बोडका होईल. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयावर आता स्थानिक रहिवासी आणि बदलापुरकर संताप व्यक्त करत आहेत.

सिग्नल यंत्रणा आणि चौक सुशोभीकरणया चौकासह शहरातील महत्वाच्या चौकात सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. तसेच येथे कारंजा लावून सुशोभीकरण केले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चौकात सिग्नलची खरच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या चौकात कोंडी झाल्याचे ऐकीवात नाही. या झाडाला धडकून अपघात झाल्याचेही वृत्त नाही. मग हा वड काढणे किती संयुक्तिक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. यापूर्वीही वडाच्या झाडाचे आकारमान कमी करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोडाजवळची माती काढून फांद्याही कापण्यात आल्या होत्या. तर यापूर्वी दोन वेळा हे झाड हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी यांच्या विरोधामुळे ते वाचले होते. आताही प्रेस क्लब ऑफ बदलापुरने हे वृक्ष तोडण्यास हकरत नोंदवली आहे. तर शहर भकास करून विकास नको, अशी प्रतिक्रिया स्थानिक ऍड. तुषार साटपे यांनी दिली आहे. याविरूद्ध आम्ही आंदोलन उभारू असाही इशारा त्यांनी दिला आहे.