अंबरनाथ : शहराच्या वाहतुकीस नवा आयाम देणाऱ्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेत अंबरनाथमधील स्थानकांचे स्थान आणि नामकरण ठरवण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माजी नियोजन समिती सभापती कुणाल भोईर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. महात्मा गांधी विद्यालयाजवळील प्रस्तावित स्थानकाला ‘श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर मेट्रो स्टेशन’ असे नाव देऊन शहराची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करावी, असे त्यांनी निवेदनाद्वारे सुचवले आहे. मेट्रो पाच मार्गिकेच्या विस्तारात उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
नुकतीच खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत अंबरनाथमधील प्रस्तावित मेट्रो स्थानकांवर चर्चा झाली. या बैठकीत कानसई विभागाजवळील स्थानकाला ‘कानसई गाव मेट्रो स्टेशन’ आणि महात्मा गांधी शाळेजवळील स्थानकाला ‘श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भोईर यांनी याबाबत खासदारांना निवेदनही दिले.
सध्या मेट्रो मार्गिका ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण ) ही पुढे उल्हासनगर आणि अंबरनाथला जोडणी जाणार आहे. तर यातील एक मार्गिका बिर्ला महाविद्यालयामार्गे पुन्हा कल्याणला जाणार आहे. त्यामुळे शहराचा बहुतांश भाग मेट्रोच्या कवेत येतो आहे. पुढे हीच मेट्रो मार्गिका उल्हासनगर मार्गे कल्याण बदलापूर राज्यमार्गावरून अंबरनाथ शहरातू थेट चिखलोली पर्यंत नेण्याचा निर्मय घेण्यात आला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील चिखलोली येथे रेल्वे स्थानकाचे काम सुरू आहे. येथेच मेट्रो १४ आणि मेट्रो पाचचा संगम करण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे चिखलोली येथे मेट्रो आणि रेल्वेचे एकत्रिककरण होणार आहे. मेट्रो मार्गिका १४ तळोजा–काटई–नेवाळी–आनंदनगर एमआयडीसी–टी सर्कल–बदलापूर अशी प्रवास करणार आहे. त्यांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तर मेट्रो पाचच्या विस्तारीकरमात कल्याण–बदलापूर महामार्गाजवळ, जीएनपी प्लाझा परिसरात अंबरनाथसाठी स्थानक प्रस्तावित आहे. मार्गिका ५ आणि मार्गिका १४ यांचे एकत्रीकरण केल्यास ठाणे तसेच नवी मुंबईकडे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि किफायतशीर होईल.
अंबरनाथ–उल्हासनगर परिसरावर मेट्रोचा परिणाम
मेट्रो पाचचा विस्तार अंबरनाथ आणि उल्हासनगरसाठी नवी वाहतुकीची क्रांती ठरणार आहे. या शहरांची वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि रेल्वेवरील ताण या पार्श्वभूमीवर मेट्रो हा अत्यावश्यक पर्याय ठरत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे थेट, जलद पोहोच मिळाल्याने येथील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. उल्हासनगर व अंबरनाथमधील व्यापारी, औद्योगिक तसेच शैक्षणिक प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
याशिवाय, प्रस्तावित ‘श्री क्षेत्र प्राचीन शिवमंदिर मेट्रो स्टेशन’ हे स्थानक धार्मिक पर्यटनालाही चालना देईल. अंबरनाथचे ऐतिहासिक व पुरातन शिवमंदिर राज्यभरातील भाविकांना आकर्षित करते. मेट्रो स्थानकाला त्याचे नाव दिल्याने ती ओळख आणखी ठसठशीत होणार आहे.