नीलेश पानमंद

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपन्यांपासून ते रासायनिक कंपन्यांपर्यंतची अशी सर्वच प्रकारची गोदामे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. या गोदामांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे गोदामातील साहित्याचे नुकसान होण्याबरोबरच जीवितहानीच्या प्रकार घडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारणीची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती, परंतु ही घोषणा केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात हातमाग आणि यंत्रमागाचे कारखाने मोठ्या प्रमाणात होते. भारतातील मॅँचेस्टर म्हणून या शहराची यापूर्वी ओळख होती, परंतु गेल्या काही वर्षात ही ओळख बदलली असून भारतातील गोदामांचे शहर अशी भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. गोदामांच्या विस्तारामुळे एक मोठे आर्थिक केंद्र येथे स्थिरावले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील ई-कॅामर्स कंपन्यांची सर्वाधिक गोदामे येथे सुरू आहेत. रासायनिक कंपन्यांची गोदामे याठिकाणी आहेत. तसेच अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असा साठा गोदामांमध्ये ठेवण्यात येतो. येथूनच पुढे तो इतर शहरात पाठविण्यात येतो. साधारणपणे २० कोटी चौरस फूट क्षेत्रफळाची दहा हजारांहून अधिक अधिकृत, अनधिकृत गोदामे या भागात असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>ठाणे : वेठबिगारी प्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्याचे व्यावसायिक केंद्र बनलेल्या भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याठिकाणी आग विझविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. गोदामे एकमेकांना खेटून बांधण्यात आलेली आहेत. त्यामुळे एखाद्या गोदामामध्ये आग लागली तर ती आग बाजूच्या गोदामांपर्यंत पोहचते. आग विझविण्यासाठी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली महापालिकांवर अवलंबून राहावे लागते.

वाहतूक कोंडीमुळे काही वेळेस घटनास्थळी अग्निशमन यंत्रणेला पोहचण्यास उशीर होता. यामुळे गोदामांचे आगीत मोठे नुकसाने होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणीचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. पुढे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारणीची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली, परंतु ही घोषणाही कागदावरच असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची गय नाही

गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी

काही महिन्यांपूर्वी काल्हेर गावातील एका रासायनिक गोदामाला आग लागली होती. ही आग इतरत्र पसरून बाजूच्या दहा गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. तर, ८ नोव्हेंबर २०३२३ रोजी ओवळी गावातील कापसाच्या गोदामाला आग लागून त्यात माय-लेकांचा मृत्यू झाला होता.

करोनामुळे प्रस्ताव लांबणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणीसाठी एमएमआरडीएने २०२० मध्ये मान्यता दिली होती. करोनामुळे अग्निशमन केंद्र उभारणीचा प्रस्ताव लांबणीवर पडला. करोना संकट दूर झाल्यानंतर एमएमआरडीएने अग्निशमन केंद्र उभारणीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधीक्षक संवर्गासह इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली होती. या भरतीचे पुढे काय झाले, याबाबत मात्र समजू शकलेले नाही. या संदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून माहिती मिळू शकलेली नाही.