भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला दिला. परंतु, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे महामार्गात दोन तुकडे झाले आहेत. महामार्गासाठी आवश्यक जमिनी एमएसआरडीसीने ताब्यात घेऊन उर्वरित तुकडे आम्ही ताब्यात घेणार नाही आणि त्यांचा आम्हाला काही लाभ नसल्याने आम्ही त्याचा मोबदला देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर पट्टय़ात महामार्गामुळे जमिनीचे २० गुंठय़ापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे झालेले २३५ शेतकरी आहेत. समृद्धी महामार्गासाठी महामंडळाला नाशिक आणि त्यापुढील भागात शेतकऱ्यांकडून जमिनीचे सलग पट्टे उपलब्ध झाले. ठाणे जिल्ह्यात भात शेती, जमिनीच्या भाऊबंदकीत वाटण्या झाल्या असल्याने जमिनीचे गुंठेवारी मध्ये तुकडे झाले आहेत.
अनेक शेतकऱ्यांची ही गुंठेवारीतील जमीन समृद्धी महामार्गात गेली. या मधील जमिनीचा काही भाग महामार्गाने बाधित होत आहे. त्याच्या लगतचा भाग महामंडळाला आवश्यक नसल्याने महामंडळाने त्याचा ताबा शेतकऱ्यांकडे ठेवला आहे. या जमिनीच्या टीचभर तुकडय़ाचे आम्ही करू काय असा प्रश्न करून बाधित शेतकऱ्यांनी या जमिनी महामंडळाने ताब्यात घेऊन त्याचा मोबदला आम्हाला द्यावा अशी मागणी केली आहे.
आवश्यक जमीन ताब्यात मिळाल्याने महामंडळाने आता उर्वरित जमिनीच्या तुकडय़ावरून हात वर केले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या तुकडा जमिनीचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, असे कल्याण, भिवंडी, शहापूर भागातील बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.
‘एमएसआरडीसी’चे म्हणणे..
‘एमएसआरडीसी’ने बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. महामार्गामुळे जमिनीचे तुकडे झालेले भिवंडी ते नागपूर ७५० किमीच्या पट्टय़ात १३ जिल्ह्यांमध्ये अठराशे शेतकरी आहेत. हे तुकडे खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर ‘एमएसआरडीसी’वर सुमारे चौदाशे कोटीचा बोजा पडेल, अशी माहिती एका उच्चपदस्थाने दिली. हे तुकडे महामार्ग किंवा महामंडळाच्याही कामाचे नसल्याने हे तुकडे ताब्यात न घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे..
शासन महसूल नियमान्वये २० गुंठय़ापेक्षा कमी असलेल्या क्षेत्राचा नवीन तुकडा करता येत नाही. तुकडेबंदी अधिनियमाने या क्षेत्राचे खरेदीखत होत नाही. जमिनीचा लहानसा तुकडा हा महामार्गालगत असल्याने तेथे जाण्यासाठी महामार्गामुळे पोहच रस्ता नाही. या तुकडय़ांमध्ये नवीन बांधकाम करता येणार नाही किंवा ही जमीन लागवडी खाली आणणे शक्य होणार नाही, असे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. जमीन तुकडय़ात असल्याने ती कोणी खरेदी करणार नाही, अशी कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे.
समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे झाले. ते तुकडे महामंडळ किंवा महामार्गासाठी आता कामाचे नाहीत. त्यामुळे तुर्तास त्याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. – बापूसाहेब साळुंखे अधीक्षक अभियंता एमएसआरडीसी