तीन भूमाफियांवर गुन्हा दाखल

डोंबिवली – डोंबिवलीतील दावडी गावातील सेंट जाॅन शाळेसमोरील पाटीदार भवन लगतच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जमिनीवर कब्जेदार आणि दोन भूमाफियांनी आठ माळ्याची नऊ वर्षाच्या कालावधीत तनिष्का रेसिडेन्सी नावाने एक बेकायदा इमारत उभारली. या इमारतीत डोंबिवली, २७ गाव परिसरातील एका शिक्षिकेसह सात जणांंनी नऊ ते २० लाखापर्यंत रकमा भरणा करून घर, गाळ्यांसाठी भूमाफियांंकडे एक कोटी २१ लाख रूपये भरणा केले. नऊ वर्षाच्या कालावधीत या बेकायदा इमारतीत घर, गाळा नाहीच, पण आपले पैसेही परत न मिळाल्याने फसवणूक झालेल्या एका शिक्षिकेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांंनी तीन भूमाफियांंविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

डाॅ. आंबेडकर यांच्या वारसांची ही जमीन असल्याने या जमिनीवरील भूमाफियांची इमारत कल्याण डोंबिवली पालिकेने जमीनदोस्त करावी आणि या जमिनीचा ताबा डाॅ. आंंबेडकरांच्या वारसांंना देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीवरून पालिकेच्या आय प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त भारत पवार यांंनी ही आठ माळ्याची बेकायदा इमारत पाच महिन्यापूर्वी भुईसपाट केली.

या इमारतीला पालिकेच्या बांधकाम परवानग्या आहेत, अशी खोटी माहिती देऊन भूमाफियांनी घर खरेदीदारांकडून घर नोंंदणीच्या आगाऊ रकमा स्वीकारल्या होत्या.

फसवणूक झालेले नागरिक

तनिष्का रेसिडेन्सी या बेकायदा इमारतीत शिक्षिका सरिता पांडे (रा. दावडी), सुधा तिवारी, शिवआसरे प्रजापती (रा. गोवंडी), बरसा यादव (रा. सोनारपाडा), विकास यादव (रा. चक्कीनाका), अशोककुमार प्रजापती, लालबहादूर यादव, अब्दुल गनी खान (सर्व रा. दावडी) या घर खरेदीदारांंची फसवणूक झाली आहे. सरिता पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जमीन कब्जेदार तुळशीराम काळण, अनमोल डेव्हलपर्सचे मोहिनीराज निवृत्ती पाखले, ललित महाजन या भूमाफियांंविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात एक कोटी २१ लाख ५१ हजार रूपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शिक्षिका सरिता पांडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, २०१७ मध्ये मी डोंबिवली जवळील दावडी येथील सेंट जाॅन शाळेसमोरील पाटीदार भवनजवळच्या तनिष्का रेसिडेन्सी इमारतीत १० लाख २५ हजाराला एक गाळा मोहिनीराज पाखले या विकासकाकडून खरेदी केला होता. या गाळ्याचे सात लाख रूपये पाखले यांच्याकडे भरणा केले. पाखले यांनी या इमारतीचा व्यवहार आपण प्रकाश नायक यांना हस्तांतरित केला आहे, असे पांडे यांना सांंगितले. हा व्यवहार पुन्हा नायक यांनी पाखले आणि ललित महाजन यांना हस्तांतरित केला. पाखले यांनी इमारतीचे बहुततांशी बांधकाम पूर्ण केले होते. गाळ्यासाठी सरिता पांडे यांंनी ५० ते ९० हजार रूपये या भूमाफियांकडे जमा केले. सरिता यांंना बँकेतून कर्ज काढून देण्यासाठी पाखले, महाजन यांनी सरिता यांच्याकडून कर्जासाठीची आवश्यक कागदपत्रे घेतली. त्यानंतर कर्ज नाहीच, पण गाळ्याचा ताबा मिळत नसल्याने सरिता यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. पाखले, महाजन यांनी सरिता यांना पैसे देण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. आपल्यासह इतर सात जणांची अशाचप्रकारे मूळ करारनामा करणारे तुळशीराम काळण, ललित महाजन आणि मोहिनीराज पाखले यांनी घर, गाळा खरेदीसाठी पैसे घेऊन त्यांना गाळा, पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली म्हणून सरिता पांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.