Ghodbunder Road: ठाणे येथील घोडबंदर मार्गावरील वाघबीळ उड्डाणपूलावर एक भलामोठा खड्डा पडला. या खड्ड्याचा आकार आणि खोली इतकी मोठी होती की, रस्त्यामध्ये टाकण्यात आलेल्या सळया देखील दिसत होत्या. अखेर या खड्ड्याचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा बुजविण्याचे काम सुरु केले. या घटनेमुळे घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीचा जाच नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच वाघबीळ उड्डाणपूलावर पडलेल्या खड्ड्याचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित होताच, घोडबंदर रस्त्याची भीषण स्थिती पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.
उड्डाणपूलांची स्थिती
– घोडबंदर मार्गावर वाहतुकीसाठी मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवली आणि नागलाबंदर ही महत्त्वाची उड्डाणपूल आहेत. यातील कासारवडवली आणि नागलाबंदर उड्डाणपूल याच वर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारली आहेत. तर, पातलीपाडा, वाघबीळ आणि मानपाडा उड्डाणपूल जुनी असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते.
यातील वाघबीळ या उड्डाणपूलावर भला मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हा खड्डा इतका मोठा आणि खोल होता की, रस्त्यामधील सळया दिसू लागल्या होत्या. या खड्ड्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
खड्डा बुजविताना कोंडी
– खड्डा बुजविण्यासाठी येथील खड्डा असलेल्या भागातील वाहतुक बंद करावी लागली. त्यामुळे खड्डा बुजविताना त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसला होता.
नागरिकांकडून संताप
– गेल्याकाही महिन्यांपासून घोडबंदर येथील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असतानाही त्यावर तात्पुरती डागडुजी करुन ते खड्डे बुजविले जातात. त्यामुळे या खड्ड्यांवर कायमचा उपाय करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घोडबंदरमधील खड्ड्याचा जाच केव्हा संपणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.