ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे यांना साथ दिली असतानाच, दुसरीकडे गेल्या काही वर्षात शिंदे यांनी डावल्यामुळे अडगळीत गेलेले आगरी-कोळी समाजाचे नेते आता सक्रीय झाले आहेत. या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेनेने ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड भागात आगरी-कोळी समाजाची मोट बांधण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची भुमिका शिवसेनेने जाहीर करत शिंदे यांना एकप्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगरी-कोळी समाज आहे. हा शिवसेनेसोबत असल्याचे यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले होते. या समाजाकडून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत होती. तर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्याचा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला होता. त्यांच्या अखत्यारित असलेल्या सिडकोने तशाप्रकारचा ठरावही पारित केला होता. यामुळे आगरी-कोळी समाज दुखावला गेला होता आणि त्यांनी दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलने केली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आगरी-कोळी समाज शिवसेनेपासून दूरावत चालला होता. या समाजाचे नेते म्हणून दिवंगत माजी आमदार अनंत तरे, माजी आमदार सुभाष भोईर हे ओळखले जातात. त्यापैकी तरे यांचे निधन झाले असून ते अखेरपर्यंत शिवसेनेतच कार्यरत होते. त्याचबरोबर भोईर हे सुद्धा सेनेतेच कार्यरत आहेत. परंतु शिंदे यांच्याशी फारसे जमत नसल्यामुळे हे सर्वच नेते अडगळीत गेले होते. परंतु त्यांनी पक्ष मात्र सोडला नव्हता.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता हेच नेते सक्रीय झाले असून त्यांनी पक्षबांधणीचे काम सुरु केल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेनेच्या वरिष्ठांनी याच नेत्यांच्या माध्यमातून शिंदे यांच्यामुळे पक्षापासून दुरावलेल्या आगरी-कोळी समाजाला आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार सुभाष भोईर, बबन पाटील, अनंत तरे यांचे बंधू संजय तरे यांच्यासह ५० जणांनी शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार बाळाराम पाटील आणि दि.बा. पाटील संघर्ष समितीचे नेतेही उपस्थित होते. त्यावेळेस नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची भुमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करत आगरी-कोळी समाजाची एकप्रकारे मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने उद्धव यांनी शिंदे यांच्यावर आगरी-कोळी समाज उलतविण्याची खेळी खेळल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेने नरेश म्हस्के यांच्यापाठोपाठ मिनाक्षी शिंदे यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्या ठाणे महापालिकेच्या माजी महापौर असून त्या आक्रमकपणे भुमिका मांडणाऱ्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.