scorecardresearch

ठाण्यातून जाणाऱ्या मुंबईच्या जलबोगद्याला गळती; पाच महिने उलटूनही दुरुस्तीचे काम करण्याकडे दुर्लक्ष

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा जलबोगदा ठाणे शहरातील किसननगर भागातून जात असून याठिकाणी बोरवेल खोदकामामुळे जलबोगद्याला गळली लागली आहे.

Leakage in Mumbai water tunnel Thane water issue in Thane
ठाण्यातून जाणाऱ्या मुंबईच्या जलबोगद्याला गळती

दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी जातेय वाया; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा जलबोगदा ठाणे शहरातील किसननगर भागातून जात असून याठिकाणी बोरवेल खोदकामामुळे जलबोगद्याला गळती लागली आहे. पाच महिने उलटूनही या दुरुस्तीच्या कामामुळे दुर्लक्ष केले जात असून यामुळे दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही पाण्याची नासाडी थांबविण्याबरोबरच कोणत्याही परवानगीविना बोरवेलसाठी खोदकाम करून जल बोगद्याला हानी पोहोचविल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे काँग्रेसने केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा जलबोगदा ठाणे शहरातील किसननगर भागातून जात असून याठिकाणी बोरवेल खोदकामामुळे जलबोगद्याला गळती

ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहीन्या ठाणे शहरातून जात असून त्या फुटण्याचे प्रकार घडत होते. त्यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेेने जलबोगदा तयार केला असून त्यातून भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेण्यात येते. हा जलबोगदा किसननगर भागातून जात असून याठिकाणी नोव्हेंबर महिन्यात बोरवेलसाठी खोदकाम करण्यात आले. या कामामुळे जलबोगद्याला गळती लागली असून मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. वाया जाणारे पाणी निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने गटारात व नाल्यात सोडलेले दिसत आहे, असा दावा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. याठिकाणी अद्यापही दुरुस्ती का झाली नाही अशी विचारणा करत याप्रकरणी त्यांनी उपजलअभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे.

हेही वाचा >>>Video गोष्ट असामान्यांची: सिग्नलवरील मुलांसाठी शिक्षणाचं दार खुलं करणारी ‘सिग्नल शाळा’

दुरुस्तीसाठी २० जानेवारी २०२३ पासून हा जलबोगदा बंद करावा लागणार असून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रक्रियेशिवाय पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी उकळून प्यावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात होते. मात्र अद्यापही याचे काम काही सुरु झालेले नाही. काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेट, किसन नगर भागात जलवाहीनी फुटून महापूर आला होता. वागळे इस्टेटचा बहुतांश भाग त्यावेळी जलमय झाला होता. याचा फटका अंदाजे दहा ते पंधरा हजार रहिवाशांना बसला होता. या ठिकाणी असलेल्या जल बोगद्याला जास्त प्रमाणात हानी पोहोचली असती तर मागील वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट

मुख्य भूमिगत जल बोगदा जर कोणत्याही प्रकारे काम करताना फुटला गेला तर संबंधित कंपनी अथवा प्राधिकरणाला दुरुस्तीचा खर्च, पयार्यी व्यवस्थेचा खर्च,वाहून गेलेल्या पाण्याच्या किंमतीचा खर्च या दोघांची एकूण रक्कम अधिक ४०० टक्के दंड आकारला जाणार असल्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असल्याचे समजते. परंतु या ठिकाणी कुठलीही परवानगी नसताना बोरवेलसाठी खोदकाम करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत जल बोगद्याला हानी पोहोचविल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल का केला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाने अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यासाठी कडक नियम करणे गरजेचे असल्याची मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या