ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरुन परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतुक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने खारेगाव टोलनाका भागात गस्त घातली होती. बुधवारी सकाळी ६.२० वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, सहाचाकी टेम्पो संशयास्पद रीतीने जात आहे.

पथकाने तपासणी केल्यावर या वाहनात गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईत पथकाने एक कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक मोहम्मद सलमानी याला अटक केली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदिप पवार, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, उप अधीक्षक वैद्य, पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर. महाले, एस.आर. मिसाळ, साहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी. थोरात, जवान पी.ए. महाजन, व्ही.के. पाटील, एस.एस. यादव, पी.पी. पाटील, एम.जी. शेख यांनी केली.