डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील गावदेवी मंदिरात मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान चोरी करून दानपेटीतील ३७ हजाराची रक्कम चोरून नेणाऱ्या आयरे परिसरातील तुकारामनगर भागातील एका स्थानिक तरूणाला रामनगर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणातील माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे अटक केली आहे.

संभाजी राम बिराजदार (२५ ) असे या तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर मधील शेवंती छाया इमारतीत कुटुंबीयांसह राहतो. आयरेगाव येथे गावकीचे गावदेवी मंदिर आहे. ग्रामस्थांकडून दररोज गावदेवीची पूजाअर्चा केली जाते. मंदिरात दानपेटी आहे. मंदिराला प्रवेशद्वार संध्याकाळची पूजाअर्चा झाली की मंदिराचा दरवाजा रात्री बंद केला जातो. मंगळवारी रात्री गावदेवी मंदिरात संध्याकाळची पूजाअर्चा झाल्यानंतर मंदिर कुलुप लावून बंद करण्यात आले होते.

बुधवारी सकाळी भाविक गावदेवीची पूजा करण्यासाठी गावदेवी मंदिरात येऊ लागले. त्यांना मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडी, कुलुप तोडण्यात आले आहे. मंदिरातील दानपेटीची उलटापालट केली असल्याचे आढळले. ही माहिती तात्काळ आयरे गावातील गावदेवी व्यवस्थापन समितीला देण्यात आली. मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य मंदिरात आले. त्यांना गावदेवी मंदिरात चोरट्यान चोरी करून दानपेटीतील रक्कम चोरून नेल्याचे आढळले. तात्काळ गाव समितीने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गावदेवी मंदिर व्यवस्थापन समितीच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तात्काळ एक विशेष पोलीस पथक तयार करून याप्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश साहाय्यक पोलीस निरीक्षक मुपडे, उपनिरीक्षक चव्हाण यांना दिले. या पथकाने गावदेवी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी त्यांना गावदेवी मंदिरापासून काही अंतरावर एक तरूण एका रिक्षेतून येत आहे. तेथून तो लक्ष्मण रेषा इमारतीजवळ रिक्षा थांबवून तेथून तो पायी गावदेवी मंदिरात येत आहे असे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आले.

ओळख पटू नये म्हणून या तरूणाने लाल रंंगाचे हुडी जॅकेट घातले होते. संभाजी बिराजदार गावदेवी मंदिराजवळ आल्यावर त्याने धारदार वस्तुने मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलुप तोडून टाकले. त्याने मंदिरातील दानपेटीचे कुलुप तोडून त्यामधील ३७ हजार ५१८ रूपयांची वाहनावळ चोरून नेली.

पोलिसांंनी सीसीटीव्ही चित्रण परिसरातील जाणकार रहिवासी, गावदेवी व्यवस्थापन समितीली दाखवले. त्यावेळी चोरी करणारा इसम हा तुकारामनगर मधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोठ्या कौशल्याने चोरी घडल्यानंतर संभाजी बिराजदारला कोठे पळून जाण्याची संंधी न देता त्याला अटक केली. त्याच्याकडून दानपेटीतील ३७ हजाराची वाहणावळेची रक्कम, चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण एक लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक खेडकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे, प्रसाद चव्हाण, मंगेश शिर्के, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत सरनाईक, नीलेश पाटील सहभागी झाले होते.