ठाणे – गणेशोत्सवासाठी शहरातील अनेक रिक्षाचालक हे त्यांच्या मुळ गावी गेल्यामुळे शहरात रिक्षांचा तुटवडा भासत आहे. ठाणे शहरातील स्थानक परिसरासह विविध भागातील शेअरिंग रिक्षा थांबा आणि मीटर रिक्षा थांब्यावर मंगळवारी सकाळी नोकरदार वर्गाच्या रांग लागल्याचे चित्र आहे. प्रवाशांना वीस-वीस पंचवीस मिनिटाच्या अंतराने रिक्षा मिळत आहे. त्यामुळे त्यांना कार्यालयात पोहोचण्यास देखील उशिर झाला.
गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. कोकणवासी त्यांच्या मुळगावी गेले आहेत. तर, अनेकांच्या घरी गणपतीचे आगमन होणार आहे, त्यामुळे त्याची लगबग सुरु आहे. ठाणे शहरातील रिक्षा चालक कोकणातील, पश्चिम महाराष्ट्रातील तसेच इतर भागातील आहेत. गणेशोत्सवानिमित्त अनेक रिक्षा चालक हे त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर, अनेकांच्या घरी गणपतीचे आगमन होणार असल्यामुळे त्यांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. याचा फटका नोकरदार वर्गाला बसू लागला आहे.
ठाणे शहरातील विविध भागातील शेअर रिक्षा तसेच मीटर रिक्षा थांब्यावर मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. तर, ठाणे शहरात विविध मार्गावर ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या बस गाड्या सोडल्या जात असल्या तरी, या बस गाड्यांची संख्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या बसगाड्यांसाठी देखील प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवासी शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परंतू, गणेशोत्सवानिमित्त शहरात रिक्षांचा तुटवडा भासू लागल्यामुळे रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. स्थानक परिसरातील बी कॅबीन रोडवर प्रवासी रिक्षाच्या शोधात विखुरलेले पाहायला मिळत आहे. प्रवाशांना रिक्षा वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाही त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला.
सोमवारी रात्री रिक्षाच्या शोधात प्रवाश्यांची पायपीट
ठाणे शहराच्या विविध भागातून सोमवारी सायंकाळपासून काही राजकीय मंडळींकडून कोकणात एसटी बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या एसटी गाड्या शहरातील अंतर्गत भागातून सोडण्यात आल्या. तेथील रस्ते अरुंद, रस्त्याच्या दुर्तफा मार्गावर उभी असलेली वाहने आणि त्यात या एसटी बस गाड्यांची भर पडली. यामुळे वाहतूक कोंडी (Traffic) झाली होती. ठाणे महापालिका मुख्यालयापासून ते ज्ञानेश्वर नगर, खोपट, कॅडबरी जंक्शन, शिवाईनगर असे सर्वच मार्ग कोंडीत अडकले होते. याचा फटका सायंकाळी स्थानक परिसरातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसला. आधीच रिक्षांचा तुटवडा, अपुरी बस व्यवस्था त्यात झालेल्या या कोंडीत अनेक रिक्षा तसेच बस अडकून पडल्या होत्या. त्यामुळे स्थानक परिसरातून सोमवारी रात्री रिक्षा आणि बस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक प्रवाशांनी पायी घरी जाण्याचा मार्ग अवलंबला.