किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : पर्यावरणदृष्टया अत्यंत संवेदनशील आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलात सध्या अशांतता वाढत आहे. ढाबे आणि हॉटेल्स तसेच खासगी बंगल्यांमधील लग्नसमारंभ आणि राजकीय नेत्यांचे वाढदिवस, त्यानिमित्ताने झडणाऱ्या मेजवान्यांमधील कानठळय़ा बसविणाऱ्या संगीतामुळे येऊरचे पर्यावरण धोक्यात आले आहे. या साऱ्या प्रकारांकडे ठाणे महानगरपालिका आणि वन विभाग पद्धतशीर कानाडोळा करीत असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.
बेकायदा टर्फ, क्लबमधील प्रखर प्रकाशझोतात रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे क्रिकेट आणि फुटबॉलच्या सामन्यांमुळे येऊर क्षेत्रातील प्राणी, पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आल्याच्या तक्रारी काहींनी केल्या आहेत.
हे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. ठाणे शहराला प्राणवायूचा पुरवठा करणारे केंद्र म्हणूनही येऊर महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र काही राजकीय नेत्यांचे आलिशान बंगले, आदिवासी जमिनींच्या कागदपत्रातील फेरफार करून, तसेच काही राजकीय नेत्यांनी जमिनी खरेदीचा लावलेला सपाटा यामुळे येऊरचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली.
नियम पायदळी
येऊरमध्ये बेकायदा पद्धतीने हॉटेल, ढाबे उभारण्यात आले आहेत. तसेच काही वरिष्ठ शासकीय अधिकारी, राजकीय नेते यांचे बंगलेही या भागात आहेत. याआधी साधारपणे सुट्टयांचे दिवस अथवा शनिवार-रविवार अशा दिवशी या ठिकाणी खासगी पाटर्य़ा होत असत. नियमानुसार, येऊर परिक्षेत्रात सायंकाळी ६ वाजल्यानंतर येथे ग्रामस्थांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी आहे.
प्राणी-पक्ष्यांना धोका?
येऊरमध्ये रात्रीच्या वेळेत प्रकाशझोतामुळे पक्षी आणि प्राण्यांच्या अधिवासाचा धोका निर्माण झाला आहे. सर्वाधिक त्रास हा निशाचर प्राण्यांना आणि स्थलांतरित पक्ष्यांना होत आहे. काही दिवसांपूर्वी वायू दलाच्या प्रवेशद्वाराजवळ बिबटय़ाचे पिल्लू आढळून आले होते. त्या बिबटय़ाच्या पिल्लाला पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. या पिल्लाला मादी बिबटय़ा घेऊन जाईल असे वन विभागाला वाटले होते. परंतु तसे झाले नाही. ती दिशा चुकली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. गोंगाटामुळे एका बिबटय़ाला त्याच्या आईपासून दूर पिंजऱ्यात राहावे लागत आहे, अशी खंत पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत.
कारवाईत अडचणी यासंदर्भात वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता, नाव छापू नये या अटीवर त्यांनी सांगितले की, येऊरचा काही भाग हा ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असल्याने कारवाई करण्यासाठी आम्हाला अडचणी येत असतात. या प्रकारामुळे ठाणे महापालिका आणि वन विभागाकडून कारवाईची टोलवाटोलव सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रात्रीच्या वेळेत या ठिकाणी गोंगाट असतो. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली जाईल.
– रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी
पूर्वी आम्हाला रात्री घुबड, वटवाघुळे, टिटवी यांसारखे पक्षी दिसत असत. परंतु येऊरमध्ये ढाबे, हॉटेल, बंगल्यावरील वृक्षांना विद्युत रोषणाई करण्यात आल्याने आता रात्रीच्या वेळेत दिसणारे हे पक्षी गायब झाले आहेत.
– रमेश वळवी, स्थानिक रहिवासी