महापालिकेचाही प्रदूषणास हातभार

ठाणेकरांसाठी पर्यटन आणि सकाळ-सायंकाळी फेरफटका, व्यायाम करण्याचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या उपवन तलाव परिसराला श्राद्धविधींमुळे अक्षरश अवकळा आली असून  सर्वपित्री अमावास्येनिमित्ताने शनिवारी या भागात विधी उरकण्यासाठी ठाणे महापालिकेनेच पाण्याच्या टाक्या पुरविल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच भागात महापालिकेने कोटय़वधी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या वाराणसी घाटाचा वापर श्राद्धविधींसाठी होत आहे.

ठाणे येथील येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात येतो. निसर्गरम्य येऊर डोंगराच्या पायथ्याशी उपवन तलाव आहे. या तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी तलावाच्या परिसरात विविध प्रकल्प राबविले जात आहेत. या तलावास नवी झळाळी प्राप्त व्हावी यासाठी तलावाशेजारीच कोटय़वधी रुपये खर्च करून वाराणसीच्या धर्तीवर घाटाची उभारणी केली जात आहे. या घाटाचा वापर दशक्रिया किंवा श्राद्धविधींसाठी होईल, अशी भीती येथे दररोज फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या घाटाचा श्राद्धविधी कार्यक्रमांसाठी वापर केला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, तरीही या ठिकाणी सर्रासपणे श्राद्धविधी होऊ लागले असून त्यामुळे या परिसराला अवकळा येत आहे.

यापूर्वी बांधण्यात आलेल्या चौपाटीवरदेखील श्राद्धविधींचे कार्यक्रम होत असून यामुळे श्राद्धविधीत वापरण्यात येणाऱ्या वस्तू या पाण्यात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तलावात पाणी भरल्यामुळे पाणी तळ्याच्या काठोकाठ आले असून श्राद्धविधीचे पदार्थ हे पाण्यावर तरंगताना पाहायला मिळत आहेत. सर्वपित्री अमावास्येनिमित्त शनिवारी या ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेकडून १० हून अधिक मोठय़ा पाण्याच्या टाक्या येथील चौपाटीवर ठेवण्यात आल्या आहेत. तलावातील पाणी उपसून ते या टाक्यांमध्ये भरण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. उपवन घाट आणि चौपाटी येथे सर्वपित्री अमावास्येच्या श्राद्धविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आंघोळीसाठी तलावातील पाण्यात न उतरता टाक्यांतील पाणी घेऊन आंघोळ करावी याकरिता या टाक्यांची सुविधा पुरवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र महापालिकेने हा दावा फेटाळला असून नागरिकांनी श्राद्धविधीदरम्यान पदार्थ पाण्यात न सोडता टाक्यांतील पाण्याचा वापर करावा याकरिता ही सुविधा पुरविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

खाडीपुलांवरही विधी

कशेळी, साकेत आणि दिवे अंजूर खाडी उड्डाणपुलाच्या कठडय़ांवर मोठय़ा प्रमाणावर श्राद्धविधीचे पदार्थ ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही नागरिक हे पदार्थ थेट खाडीतील पाण्यात टाकत आहेत. दरम्यान, यामुळे हे सर्व पदार्थ रस्त्यावर आल्यामुळे पुलावर मोठी अस्वच्छता झाल्याचे पाहायला मिळत आहे.

उपवन येथे ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तलावाचे पाणी वापरण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांनी श्राद्धाचे पदार्थ तलावातील पाण्यात न सोडता त्याकरिता या टाक्यांमधील पाण्याचा वापर करावा यासाठी या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. – संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका