बॅगा तपासल्या तर काय वाईट आहे. त्याचा एवढा गवगवा करण्याची काहीच गरज नाही. बॅगा काय आमच्या पण तपासल्या जात आहेत. त्याच्यात काय घबाड आहे. आता यांच्याकडील विषयच संपल्याने बॅगा तपासल्याची दोन दिवसांपासून रडारड सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता रडणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचार सभेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा समाचार घेतला. महायुतीने घेतलेल्या निर्णयांना विरोध करणारे, लाडकी बहिण योजनेत खोडा घालणारे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील, काँग्रेसवाले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सावत्र भाऊ बाजारात फिरत आहेत. या सावत्र भावांनी लाडकी बहिण योजनेमुळे राज्य शासनाच्या पैशांचा चुराडा होत आहे असे चुकीचे वातावरण निर्माण करून उच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु, न्यायालयाने ते फेटाळून लावले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शिवसैनिकांकडून विरोधी उमेदवाराचा प्रचार; महिला कार्यकर्त्यांच्या चित्रफिती प्रसारीत, महायुतीत एकवाक्यता नाहीच

आपला लाडका भाऊ आता मंत्रालयात आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले तर लाडकी बहिण योजनेची रक्कम एकविशे रूपये केली जाईल. विधीमंडळात हा ठराव मंजुरीत आपली लाडकी बहिण सुलभा गायकवाड याही महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे प्रगतीशील, गतिमान महाराष्ट्रासाठी जनतेने रडणाऱ्यांपेक्षा आता लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा >>> मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उध्दव ठाकरे यांचे सरकार राज्यात होते. त्यावेळी राज्याची अधोगती झाली. पण राज्यात महायुतीचे सरकार येताच पुन्हा राज्यातील गुंतवणूक वाढून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आला आहे. आम्ही त्रिमूर्ती, त्रिशूळ आहोत. महाराष्ट्राला विकासाच्या केंद्रस्थानी नेण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. हेवा वाटेल अशी महाराष्ट्राची घडण करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. विविध प्रकारच्या योजना राबवून राज्यातील दुर्बल घटक, शेतकरी, मुली, महिलांना विविध प्रकारचे साहाय्य करण्याचे सरकारने प्रयत्न केले आहेत. या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. यासाठी आपण रडणाऱ्यांपेक्षा आम्हा लढणाऱ्यांना पाठबळ द्या. रडणारे रोजच रडत आहेत. असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले.