धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ठाण्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशीही कायम होते. परिणामी येथे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. तर दुसरीकडे या आंदोलनात सहभागी झालेल्या ८५ निवासी डॉक्टरांना त्यांनी कामावर त्वरित हजर व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस रुग्णालय प्रशासनाने बजावली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनाला ठाण्यातील काही खासगी डॉक्टरांनी देखील आपले दवाखाने बंद ठेवून अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे येथील डॉ. रोहन म्हामणपुरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवासी डॉक्टरांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीकरीता राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी २० मार्चपासून सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या माध्यमातून हे निवासी डॉक्टर मार्ड या संघटनेच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून कामावर आले नाहीत. या आंदोलनात ठाणे महापालिकेच्या मालकीच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ८५ निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या या डॉक्टरांनी त्वरित कामावर हजर राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस रुग्णालय प्रशासनाने बजावली आहे, अशी माहिती डॉ. कोरडे यांनी दिली. याबाबत आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. प्रताप गुंडवडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आम्हाला रुग्णांची सेवा करताना केवळ संरक्षण देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे; पण सरकार ही मागणी पूर्ण करणार नसेल तर आमचे हे आंदोलन असेच कायम राहील, असे गुंडवडे यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पुरेशे सुरक्षा रक्षक नाहीत. ते देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान. निवासी डॉक्टरांच्या या संपाला ठाण्यातील खासगी डॉक्टरांनीही रुग्णालये बंद ठेवून पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती खासगी डॉक्टरांच्या जनरक्षा संघटनेचे प्रमुख डॉ. दिनकर देसाई यांनी दिली. तसेच जोपर्यंत डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच सुरु राहील, अशी माहिती देसाई यांनी दिली. एकीकडे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले असताना दुसरीकडे कळवा रुग्णालय परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ एक ते दोन पोलीसच याठिकाणी बंदोबस्तासाठी होते, अशी माहिती मिळते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra doctors strike thane kalwa shivaji hospital doctors gets notice
First published on: 23-03-2017 at 20:26 IST