डोंबिवली – डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या बालकाने भागीरथी नदीतील ८१ किलोमीटरचे अंंतर १२ तासात पार करण्याचा विक्रम केला आहे. एवढ्या अल्पवयात आव्हानात्मक परिस्थितीत भागीरथी नदी पार करण्याचे धाडस डोंबिवलीतील एका बालकाने केल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

आर्यर्न खेडेकर असे या बालकाचे नाव आहे. तो डोंबिवली एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेत आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे ७९ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जगातील ही खुल्या गटातील जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होण्याचा निश्चय आर्यनने केला होता. आर्यन डोंबिवलीतील रूपाली रेपाळे जलतरण ॲकेडमीची विद्यार्थी आहे.

ॲकेडमीच्या संचालिका आणि ज्येष्ठ जलतरणपटू रूपाली रेपाळे यांनी भागीरथी नदीचा वेगवान प्रवाह, या नदीत पोहताना येणारी आव्हाने, त्यावेळची नैसर्गिक परिस्थिती, पाण्याचा प्रवाह या सर्वांचा अभ्यास करून आर्यन खेडेकरचा सराव करून घेतला होता. आर्यनने प्रशिक्षक रूपाली रेपाळे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जलतरणाचे सराव प्रशिक्षण पूर्ण केले. या सराव प्रशिक्षणानंतर आर्यन भागीरथी नदी सहज पार करू शकतो याची खात्री पटल्यावर त्याला पश्चिम बंगालमधील ७९ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

आई, वडिल आणि प्रशिक्षण मार्गदर्शकांचा पाठिंबा या बळावर आर्यनने संंपूर्ण शरीराला पाण्यात शरीर सुरक्षित राहील यासाठी ग्रीस लावून घेतले. स्पर्धेच्या दिवशी भागीरथी नदीत रात्रीच्या वेळेत सूर मारली. भागीरथी नदीमधील ८१ किलोमीटरचे अंतर त्याला कापायचे होते. खाडी आणि नदी यांच्या पाण्यांचे प्रवाह वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहताना जलतरण पटुची कसोटी असते.

आर्यनने भागीरथी नदीत पोहण्यास सुरूवात केल्यानंतर त्याला काही अंतरावर विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले. पाण्यात असतानाही अंग भाजून काढेल अशी सूर्याची उष्णता, पुन्हा काही अंतर पार केल्यावर अचानक समोर वाहत येणारा मलबा आणि त्यामधील अडथळे, पोहत असताना अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि पाण्याला आलेली गती. पण या सगळ्या आव्हानांना तोंड देत विना थांबा आणि अडथळा आर्यन परमेश्वराचे नाव घेत आपले लक्ष्य गाठण्यासाठी अखंड पोहत होता. त्याला त्याचे साथी पुढचे टप्पे पार करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

एक १४ वर्षाचा बालक भागीरथी नदी पार करत आहे पाहून जागोजागी आर्यनला झेंडे दाखवून त्याला पुढच्या टप्प्यांसाठी काठावरचे नागरिक जल्लोषाने प्रोत्साहित करत होते. अखेर भागीरथी नदीतील ८१ किलोमीटरचे अंंतर आर्यनने १२ तासात पार केले. आर्यन लक्ष्याच्या शेवटचा टप्पा पार करून काठावर येताच त्याला उपस्थितींना जल्लोष करत खांद्यावर घेऊन आनंदोत्सव साजरा केला.