कल्याणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोविंदवाडी वळण रस्त्याचे काम एका तबेला मालकाच्या अडवणुकीमुळे मागील चार वर्षांपासून रखडले आहे. या तबेला मालकाचे मन वळवण्यात महापालिका प्रशासन, नगरसेवक, आमदार अपयशी ठरले आहेत. कल्याणमधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यासाठी गोविंदवाडी रस्ता होणे गरजेचे असल्याने हा रखडलेला वळण रस्ता मार्गी लागण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
गोंविदवाडी प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याणमधील शिवाजी चौकात कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनानंतर आमदार संजय दत्त यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची भेट घेतली. त्यांना कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या का निर्माण झाली आहे, याविषयीचे सविस्तर निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.
शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉ. पाटील यांनी कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असे आश्वासन दिले. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासंबंधी ठोस असा नियोजन आराखडा आखला जाईल, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.   

आश्वासनांचा पाऊस
* गोविंदवाडी वळण रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक.
* वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण, डोंबिवलीचा दौरा करणार.
* वाहतूक, आरटीओ विभागात पुरेशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यात तातडीने गृहरक्षक देणार.
* शहरातील अत्यावश्यक रस्ते एकेरी मार्ग केले जातील.
* दर्शक यंत्रणा सुरू करण्याचे आदेश दिले जातील.
* बेकायदा रिक्षा चालक, वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले जातील.
* कल्याण शहराबाहेर रखडलेले ट्रक टर्मिनल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासंबंधित पालिका, ठेकेदारांमधील वाद मिटवणार.
* एकाच वेळी रस्त्यावर महानगर गॅस, बीएसएनएल, महावितरणची रस्ते खोदाईची कामे होणार नाहीत. यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची समन्वय बैठक.
* आरटीओ अधिकारी नियमित रस्त्यावर राहतील यासाठी आदेश काढणार.
* अत्यावश्यक सेवा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही.