ठाणे जिल्ह्य़ात ९५ रुपये किलो दराने तूरडाळ विक्री; शहरातील ३३ मॉल्सचा समावेश
तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे बेजार झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने खुल्या बाजारात ९५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे तूरडाळ विक्रीस सुरुवात करण्यात आली. ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमधील रिलायन्स फ्रेश, बिग बाजार, हायपर सिटी ग्रोमा अशा ३३ दुकानांमध्ये महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या तूरडाळीच्या पाकिटांची विक्री सुरू आहे. डोंबिवलीतील डि-मार्टमध्ये रविवारी अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्राहकांना तूरडाळीची विक्री करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सणासुदीच्या काळात शिधापत्रिकेव्यतिरिक्त खुल्या बाजारात नागरिकांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रविवारी डोंबिवली डी-मार्ट येथे या डाळीच्या विक्रीचा शुभारंभ अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. ही डाळ ९५ रुपये प्रती किलो या भावाने मिळणार असून ठाण्यातील ३३ मॉल्समध्ये ही डाळ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही ग्राहकांना तूरडाळीच्या पाकिटांची विक्री करण्यात आली. राज्यात १०३ रुपये आणि ९५ रुपये प्रती किलो असे डाळीचे दर असून हे संपूर्ण देशात सर्वात कमी दर आहेत. राज्य शासनाने सर्वसामान्यांचा विचार करून डाळीच्या किमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. साठेबाजांवर देखील कडक कारवाई करीत असून ९५ रुपये प्रती किलो डाळ ही रिलायन्स फ्रेश, बिग बाजार, हायपर सिटी, ग्रोमा अशा ठाणे जिल्ह्य़ातील ३३ मोठय़ा मॉल्समधून विकण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.
ठाणे जिल्ह्य़ातील विक्री केंद्रांवर १६९.८३ क्विंटल डाळ उपलब्ध झाली त्यापैकी ३२.१८ क्विंटल डाळ विक्री झाली असून या विक्री केंद्रांवरून मोठय़ा प्रमाणात डाळ विक्री होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शिधापत्रिकाधारकांना १०३ रुपये प्रती किलो डाळ विकण्याचा निर्णय घेतला आहे, ती पूर्वी खरेदी केलेली डाळ होती. आता नुकताच केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी तूरडाळीचा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासाठी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन तूर उपलब्ध झाली आहे. या तुरीची भरड करून ही तूरडाळ महाराष्ट्र शासन असे पाकिटावर नमूद करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तिचा भाव ९५ रुपये आहे.
-रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, अन्न व नागरीपुरवठा.
