ठाणे : गड-किल्ले बांधणीबाबतचा महाराजांचा दृष्टीकोन, बांधणीचे कौशल्य आजच्या पिढीला कळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गड-किल्ले यांची प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन दिवाळीमध्ये केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे ठाण्यात येणार आहेत.
दिवाळी निमित्त दरवर्षी गड-किल्ले यांची प्रतिकृती बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन मनसेच्या वतीने केले जाते. यावेळी ठाण्यातील ४६८ समूहातील तरुणांनी स्पर्धेत भाग घेतला. सुमारे २५०० पेक्षा जास्त तरुण-तरुणी या स्पर्धेत सहभागी झाली होती. आपआपल्या घरा शेजारी, इमारतीखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्यात आली होती. या प्रतिकृतीचे चित्रण, छायाचित्र ऑनलाईन मागविण्यात आले होते. दुर्ग अभ्यासकांनी त्याचे परिक्षण केले. आता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रथम पारितोषिक ५१ हजार रूपये, द्वितीय २१ हजार रूपये, तृतीय ११ हजार रूपये तसेच २५ किल्ल्यांना उत्तेजनार्थ अशी एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. यावेळी गड किल्ले स्पर्धेतील सहभागी कलाकारांच्या प्रतिकृती छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे असे मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नृत्यविष्कार यावेळी सादर करण्यात येणार आहे. गड किल्ले संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर यांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे नेते आमदार राजू पाटील, मनसे नेते अभिजीत पानसे , अविनाश जाधव, मनविसे सरचिटणीस गजानन काळे, सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे , मनविसेचे अखिल चित्रे, यश सरदेसाई,चेतन पेडणेकर,संतोष गांगुर्डे, सायली सोनावणे यांची उपस्थिती असणार आहे.